Home » शिवचरित्र » थोरले बाजीराव पेशवे » रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे

रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे

थोरले बाजीराव पेशवे - Bajirao Peshwe

थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या.

पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा हे धाकटे. बाजीरावांच्या आईचे नाव राधाबाई होते (नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या). बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव विसाजी होते, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते प्रसिद्ध होते. ते साधारण ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, कोणावरही त्यांची सहज छाप पडेल असे उमदे व्यक्तिमत्व. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐशोराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे मराठा सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते.

बालाजी विश्वनाथ भट पेशवेंच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात पेशवेपदासाठी दरबारी लोकांत वाद वाढले, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले.
त्याला २ कारणे होती:
१) यादवकालीन राजकारणापासून ते महाराणी ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते.
२) थोरले बाजीराव हे फटकळ होते, एक घाव दोन तुकडे हाच त्यांचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांना समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले.
मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजींनी त्यांची जास्त काळजी घेतली होती, त्यामुळे १७ एप्रिल १७२० रोजी स्वराज्याचा पेशवा म्हणून शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार बालाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यांना दिली.

थोरल्या बाजीरावांची मुद्रा:
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥

इ.स. १७२० मध्ये पेशवाई बाजीरावांच्या कोवळ्या खांद्यावर आली. अतुल पराक्रम गाजवत समशेरीच्या जोरावर अनेक युद्धे जिंकून त्यांनी दिल्ली काबीज केली. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या. उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी योद्धा मराठे शाहीला नर्मदेपलीकडे घेऊन जाणारा पहिला सेनापती. मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१), उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि सगळ्याच लढाया जिंकल्या आहेत. वेगवान हालचाल हेच प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्यांची रणनीती. बाजीरावांना हरवणं त्यांच्या काळातल्या कोणत्याही शत्रूला जमलं नाही. मराठेशाहीला नर्मदेपलीकडे नेणारा हा पहिलाच सेनापती. भीमथडीची तट्टे नर्मदेपार गेल्यामुळे उत्तरेकडील कबुली घोडे दक्षिणेकडे येण्याचे बंद झाले होते. भविष्यात महाराष्ट्रावर संकट कोसळूनये म्हणून महाराष्ट्राबाहेर देखील मराठी सत्ता असावी हे ओळखून त्यांनी उत्तरेत शिंदे, होळकर, पवार, बांडे असे मराठा सरदार घराणी उभी केली.

बाजीरावांचा देशभर मोठा दरारा होता. १७३९ मध्ये इराणचा नादीरशहा यांने दिल्लीवर आक्रमण केले त्यावेळी थोरले बाजीराव दिल्लीकडे निघाले या बातमीनेच नादिरशहाने दिल्ली सोडली.
बाजीरावांच्या युद्धकौशल्याची जाण आपल्याकडे नाही, बाजीरावांची निजाम अल मुल्क विरुद्धची पालखेडची प्रसिद्ध लढाई अमेरिकेतील सैनिकांना आजही लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते.
बर्नाड मॉन्टगोमेरी (Bernard Law Montgomery) या ब्रिटिश फील्डमार्शलने बाजीरावांची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे:

The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility.

उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावांनी पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला, तेव्हा छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले, मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावांनाला एक पत्र पाठवले. दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता.

जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥

याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने ”

जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥

असा गजांतमोक्षाचा हवाला देऊन बाजीरावांकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावांच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावांस नजर केला. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.

वयाच्या १३व्या वर्षी बाजीरावांचा काशीबाई यांच्याशी विवाह झाला होता. काशीबाईंपासून रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर दुसरी पत्नी राजा छत्रसालाची मानसकन्या मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. समशेरबहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत ठार झाला होता. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावांचा दराराच जबर होता, त्यांनी कोणालाच जुमानले नाही.
चिमाजी अप्पा हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. त्यांनी देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मृत्यू पावले. बाजीरावांना शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावांनी दिल्लीस आणि चिमाजींनी पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजींनी पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच वज्रेश्वरी देवीचे सुंदर मंदिर बांधले. बाजीराव आणि चिमाजी खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला.

मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, मध्यप्रदेशातील नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी ज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द त्रयोदशी शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.

संदर्भ:
निजाम पेशवे संबंध – त्र्यंबक शंकर शेजवलकर
पेशव्यांची बखर – भीमराव कुलकर्णी
स्वामी – रणजित देसाई
पेशवाईतील उत्तर-दिग्विजय – वि.वा. हडप
मराठी रियासत (खंड १-खंड ८) – गोविंद सखाराम सरदेसाई
मराठ्यांची बखर – ग्रांट डफ १८५७
भारताचा इतिहास – डॉ. श. गो. कोलारकर
पानिपतचा रणसंग्राम – सच्चिदानंद शेवडे
पेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. – प्रमोद ओक

थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० - २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या. पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा हे धाकटे. बाजीरावांच्या आईचे नाव राधाबाई होते (नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या). बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव विसाजी होते, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते प्रसिद्ध…

Review Overview

User Rating!

Summary : अशा ह्या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावाचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, ‘बाजीरावाने हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे.

User Rating: 3.9 ( 16 votes)

3 comments

  1. बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है

  2. संदेश शेटे

    नरो बापू मुदगल

  3. Ajay Tamhane

    dhanyvad mahiti baddal

Leave a Reply to संदेश शेटे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

जावजी लाड

काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड

ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोहोचला. रायगडास त्याने वेढा घातला, ही बातमी समजताच ...