Home » वीर मराठा सरदार » बाजीप्रभू देशपांडे
Bajiprabhu Deshpande
Bajiprabhu Deshpande - बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.

पावनखिंडीचा लढा

आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली. हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता. राजे स्वतः पालखीत बसले होते. रात्री नउचा सुमारचा होता (रात्रीचा पहिला प्रहर). जौहरचा वेढा गाफील होता. भवानी देवीने शत्रुसैन्यावर मोहिनी घातली होती. महाराजांनी प्रवास सुरु करताच, हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजांनीही तत्क्षणी दाखवली. खळखळत्या ओढ्यांच्या साक्षीने, जांघडभर चिखलातून, वृक्ष लतांच्या मधून, जिथे पावसाने त्रस्त झालेले वाघ गुहेत दाटी करून बसले आहेत आणि वारुळातून निघणाऱ्या सापांवर मोर चीत्कार करीत धावून जात आहेत अश्या पुर्व-हेरीत मार्गावरून शिवाजी राजे आक्रमून गेले.प्रेक्षणीय सभागृहे आणि पागा असलेल्या आपल्या विशालगडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी ह्या हेतूने मुक्काम केला.

(श्री शिवभारतातील अनुवाद)

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह विशाळगडाकडे निघाले होते. त्यावेळी, गाफील असलेले विजापूरी सैन्य आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन त्यांचा पाठलाग करू लागले. सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला, २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले.
उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. (१३ जुलै १६६०)
सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली, मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता, वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते!
बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) बांदल सैन्यासह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले, खळाळणाऱ्या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. हजारोंच्या सैन्याला फक्त ३०० मराठा मावळ्यांनी रोखले होते. लवकरात लवकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धावत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला, शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची.
सतत एक दिवस राना वनातून, अंधारात वाट काढत चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिंमतीने खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. दिवस सरला, खिंडीत अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते, आधी धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली, अंधार वाढत चालला आणी कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.
अन् आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्यात खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला! बाजी कोसळले! छाती फुटली! तरीही बाजी आनंदातच होते. “स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो.” हाच तो आनंद होता. कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. गजापूरची खिंड पावन झाली होती, घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात अजरामर पराक्रमाची शर्थ करणारा.

संदर्भ:
श्री शिवभारत
बांदल तकरीर
जेधे शकावली
जेधे करीना

छायाचित्र साभार: विनायक सुतार

बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. पावनखिंडीचा लढा आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली. हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता. राजे स्वतः पालखीत बसले होते. रात्री नउचा सुमारचा होता (रात्रीचा पहिला प्रहर). जौहरचा…

Review Overview

User Rating !

Summary : मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर तसेच बांदल शिलेदारांवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

User Rating: 3.95 ( 24 votes)

3 comments

  1. very nice information

  2. pankaj bhaldar

    khup changli mahiti dhanyvad

  3. गणेश महाडिक

    छान माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.