छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला.
शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंच्यानंतर राजाराममहाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले. याशिवाय राजाराम महाराजांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.

संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. १ फेब्रु १६८९ रोजी संभाजी महाराजांना शेख निजाम याने संगमेश्वर येथे छापा घालून कैद केले आणि अवघ्या दीड महिन्यात औरंगजेबाने त्यांची अतोनात छळ करून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुनी अमावास्येला हत्या केली. हे औरंगजेबाच्या धूर्त व कपटीपणाचे द्योतक आहे. हे करून सुद्धा औरंगजेबाचे चित्त शांत होईना, मग त्याने लगेच झुल्फिकारखानास रायगड घेण्यास रवाना केले. औरंगजेबाला ही वेळ महत्वाची होती कारण, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड मुघली सैन्याचा सामना न करता अलगद ताब्यात येईल असे त्याला वाटत होते. या संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर अवघ्या १४ व्या दिवशीच रायगडास वेढा पडला. यावेळी रायगडचे किल्लेदार होते चांगोजी काटकर आणि त्यासोबत गडावर होते येसाजी कंक.संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोहोचताच अवघ्या ८ दिवसताच राजाराम महाराजांना नजरकैदेतून सोडून त्यांचे मंचकारोहण करण्यात आले.

रायगडावर राजाराम महाराज, छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब व ८ वर्षांचा मुलगा शिवाजी हे होते (शिवाजी हे पुढे शाहू या नावाने इतिहासास परिचित आहे). त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले.

त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील कैद केलेल्या अन्य मंडळींना औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एकसमान लढा सुरू झाला. औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, संताजी जगताप, रूपसिंह भोसले, मानाजी मोरे, खंडो बल्लाळ, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हाचा अर्थ राज्याचा आधार) यांनी स्वराज्य लढत ठेवले.

सन १६९० साली मोघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला. हा वेढा सात वर्ष चालला होता, वेढा घातलेल्या मोघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते. अखेरीस १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते.

महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी सन १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले. दिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती राजाराम पराक्रमी, मुत्सद्दी होते. चांगल्या माणसांची त्यांना पारख होती. राजाराम महाराजांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण युद्ध जिंकू शकत नव्हता.

राजाराम महाराज यांच्या दोन राजमुद्रा होत्या.

प्रतीपात चन्द्रलेखेव वर्धीष्णू विश्ववंदिता । शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य राजते ।।

धर्मप्रद्योदिताशेषवर्णा दाशराथेरीव । राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते ।।

राजाराम महाराज जिंजीस असताना ज्यांना सनदा दिल्या त्यावर धर्मप्रद्योदिताशेष हि मुद्रा होती. पूर्वी दिलेल्या सनदांचा फेरविचार करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यावर ‘प्रतिपत’ अनुकरणाची मुद्रा उठवणे आवश्यक झाले, त्यानंतर दोन महिन्यांनी राजाराम महाराजांचे निधन झाले, त्यावरुन ‘प्रतिपत’ मुद्रा शेवटी केली असे दिसून येते. या दोन्ही मुद्रांचा आकार वाटोळा आहे. राजाराम महाराज यांची तिसरी मुद्रा देखील असून ती ‘श्री राजाराम छत्रपती’ एवढीच असून चौकोनी आहे. ती राजचिन्हे धारण करण्यापूर्वीची असावी.

संदर्भ:
जेधे शकावली
केशवपंडित विरचित ‘राजारामचरितम’
मल्हार रामराव चिटणीस बखर
करवीर रियासत

छायाचित्र: The Times of India Annual, 1933 (Photographer unknown)

छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंच्यानंतर राजाराममहाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले. याशिवाय राजाराम महाराजांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती. संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. १ फेब्रु १६८९ रोजी संभाजी महाराजांना शेख निजाम याने…

Review Overview

User Rating !

Summary : छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते.

User Rating: 3.1 ( 20 votes)
0

2 comments

  1. Sachin mhalu shinde

    Please give me information.

  2. छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक दिन किती तारखेला असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>