Historian Vasudev Sitaram Bendre - Shivray
Historian Vasudev Sitaram Bendre - the man who restored Sambhaji Maharaj's name and gave the world the true picture of Shivaji Maharaj.

शिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे

जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते, त्यात व्हैलेनट्यीन ह्या दुच गव्हरनरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले.

इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले. श्री. बेंद्रे यांनी मूळ चित्राचे तितक्याच आकाराचे एक छायाचित्र काढून घेतले शिवाजीराजांचे ह्या चित्रातील कल्ले हे कोणत्याही चित्रात दिसणारे नाहीत. पांढर्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे. अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत. इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली.ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे “इब्राहिमखान” पुस्तकातून हटला गेला. बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासविषयक पुस्तकातून आणि घराघरातून झाली. शिक्षण संस्थांनाच काय पण शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या चित्र मागील अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नरचे लेखन याची माहिती नसेल. ह्या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे ह्यांची एक अतिशय महत्वाची कामगिरी मानावी लागेल.

पुढे श्री बेंद्रे ह्यांनी ह्या चित्राच्या प्रसारास प्रारंभ केला. चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी इंडिया हाउस कडून परवानगी मिळवली.सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना केली. इ.स. १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्याचार्य न. ची. केळकर ह्यांनी हे चित्र समाजापुढे आणण्यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजला. तेथे या चित्राचे समारंभपूर्वक प्रकाशन केले.पुण्याच्या शिवाजी मंदिरात प्रेक्षक आले ते त्यांच्या राजाचे खरे रूप पाहण्यासाठी. शिवाजी महाराजांचे सत्य चित्र श्री.तात्यासाहेब केळकरांनी त्या दिवशी प्रकाशित केले. शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी आपल्या परदेश दौर्‍यात हस्तगत केले होते व स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले होते श्री. बेंद्रे यांनी सर्व मराठीतील वृत्तपत्रांकडे शिवरायांचे हे चित्र पाठवले आणि सर्व भाषांतील वृत्तपत्रांनी व्हॅलेंटाईनच्या पत्रासह ते छापले.रायगडचा राजा तेव्हांपासून खर्या रुपात घरोघरी गेला.

आज मंत्र्यांच्या खोल्यांमधून आणि सरकारी कार्यालयांतून श्री. बेंद्रे यांनी शोधून काढलेलेच शिवाजीराजांचे चित्र लावलेले असते. भारतीय चित्रकारांनी त्यांच्या विविध आकाराच्या प्रतिकृती काढल्या आहेत.याचे सर्व श्रेय श्री. वा. सी. बेंद्रे ह्यांनाच जाते. तेव्हा व्हैलेनट्इनच्या संबंधातील शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधीचा लेख (पत्र ) प्रसिद्ध करून श्री वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली व मराठ्यांच्या इतिहासाला तितकेच मोलाचे योगदान दिले.

वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म: पेण,रायगड जिल्हा-महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६; मृत्यू १६ जुलै १९८६) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. शिवाजीची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.

१. त्यांचे दुसरे महनीय कार्य म्हणजे, १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. हा केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांवरील अन्याय नव्हता तर संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय होता. इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्याने अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव दाखविला असून, तो पूर्वी प्रचलित असलेल्या चित्रातील मुस्लिम सरदाराच्या पेहरावाहून भिन्न आहे.

२. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सी. बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने, तोपर्यंत जनमानसात असलेली संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली गेली, आणि एक लढवय्या मराठी राजा अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. आपल्या संशोधनाच्या साहाय्याने त्यांनी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आपल्या कामावरील निष्ठा आणि प्रेम हे वा.सीं.चे गुण ते महाराष्ट्राचे सच्चे भूमिपुत्र असल्याची साक्ष देतात. त्यानंतरच्या काळात अनेक लेखक, कलाकार यांनी वा. सी. बेंद्रे यांच्या साहित्याचा आणि लिखाणाचाच आधार घेऊनच संभाजी महाराजांची प्रतिमा साकारली.

३. वा.सी. बेंद्रे यांचे संशोधन फक्त मराठा राज्याचे व राजांचे जीवनकार्य मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ज्यांनी मराठेशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली अशा तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचाही परामर्ष त्यांनी घेतला आहे. त्यांनी शोधून काढलेले अप्रकाशित संतांचे अभंग याचीच साक्ष देतात. हे अभंग त्यांच्या मृत्यूनंतर १९८६ साली प्रसिद्ध झाले.

४. सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६०च्यावर पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते सावध असत. त्यामुळे बेंद्रे यांची काही पुस्तके जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या वाचनालयात पाहायला मिळतात.

५. त्यांनी लिहिलेले ‘साधन-चिकित्सा ‘ हे पुस्तक इतिहास संशोधन करणाऱ्यांना आजही पथदर्शक ठरते आहे. हे संशोधन करताना ते अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे कसे केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पुस्तक अशा प्रकारचे एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचे पुस्तक एकही मराठी इतिहासकाराने लिहिल्याचे दिसत नाही.

६. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा.सी. बेंद्रे थांबले नाहीत तर, त्याच बरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली. उदा० शहाजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे वडील), मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे आजोबा), संभाजी भोसले (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ), राजाराम, आदिलशहा, कुतुबशहा आणि राजा जयसिंग. बेंद्रे यांनी या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. फार थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘शिव-चरित्र’ (शिवाजीचे चरित्र). हे लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी दोन वर्षे इंग्लंडमध्ये व युरोपात वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्वाची कागदपत्रे जहाजाने भारतात आणली. यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्ये समोर येऊ शकली, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार. ही तलवार ‘जगदंब’ म्हणून ओळखली जात होती, ‘भवानी तलवार ‘ म्हणून नव्हे हे बेंद्रे यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्त्व. त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानांना शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना. फक्त वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे.

९. वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी, मद्रास राज्याचे तत्कालीन मुखमंत्री राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती, ते काम वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची, जिद्दीची आणि परिश्रमाची परिणती आहे.

१०. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’हा ग्रंथ लिहिला.

वा.सी. बेंद्रे यांनी आपल्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात ५७ हून अधिक इतिहास ग्रंथ लिहिले.
त्यांची काही पुस्तके:
छत्रपती संभाजी महाराज (पृष्ठसंख्या २००, पुन:प्रकाशन, पहिली आवृत्ती १९६०, नवी एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन,कोल्हापूर).
छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) (पृष्ठसंख्या १२००, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
मालोजीराजे आणि शहाजी महाराज (पृष्ठसंख्या ५५०, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
राजाराम महाराज चरित्र
शिवराज्याभिषेक प्रयोग (पृष्ठसंख्या २००, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
साधन-चिकित्सा

Reference: v. s. bendre, Wikipedia

जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित…

Review Overview

User Rating !

Summary : वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात ५७ हून अधिक इतिहास ग्रंथ लिहिले. इतिहासाचे भिष्माचार्य कै. वा. सी. बेंद्रे यांच्या छञपती शिवाजी महाराज या पुस्तकातील शिवरायांचे हे चिञ इ.स. १६६३-६४ सुरत लूटीच्या वेळी शिवराय आणि डच गव्हर्नर व्ह्यलेंटाइन यांच्या भेटी प्रसंगी काढलेले असून, शिवाजीराजांचे ह्या चिञातील कल्ले हे अन्य कोणत्याही चिञात दिसत नाहीत, पांढ-या अंगरख्यावर चक्क उपरणे टाकलेले आहे व अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत.

User Rating: 3.76 ( 6 votes)
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>