Home » वीर मराठा सरदार » अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

मोगल म्हणजे भोंगळ! आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा! दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता! लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच! औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला यांना कसं अगदी मनाजोगं गिऱ्हाईक मिळालं होतं!
Prayagji Prabhu - प्रयागजी प्रभू

सातारा व परळी या सुभ्याचा अंमल फार पूर्वीपासून एक कणखर छातीचा व अतुल निष्ठेचा स्वराज्य सेवक पहात होता. प्रयागजी प्रभू हे त्यांचं नाव; तसं संपूर्ण नाव प्रयागजी अनंत फणसे पण मावळे आदरानं सुभेदार म्हणत. छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून ते स्वराज्यात इमानाने चाकरी करीत होते. महाराजांनी शक्तीयुक्तीची लगबग उभ्या हयातभर त्यांनी पहिली होती. अनुभवांची धार त्यांच्या कर्तबगारीला विलक्षण चढली होती. वय सत्तरीला टेकलं होतं, पण गर्दन विट्यासारखी बुलंद होती! नजरसुद्धा अशीच सांगेसारखी तिखट; एक केस काही डोक्यावर काळा राहिला नव्हता; पण म्हातारा समशेरीला असा काही जरबवान होता की तरण्याताठ्यांनाही वाचकावं! सुभेदारांवर छत्रपतींची नजर मोठी मोह्बतीची होती आणि ते स्वाभाविकच होतं. सुभेदारांसारखा अश्राफाचा सरदार गेली पन्नास वर्षे दौलातीशी आदाब बजावून होता.

सातारच्या किल्ल्याकडे औरंगजेबाची फौज फिरताच प्रयागजी ताबडतोब किल्ल्यावर पोहोचले. चहूबाजूंनी किल्ल्याला मोर्चे लागले, खुद्द औरंगजेब जातीने उत्तरेस असलेल्या करंजगावाजवळ मोर्चांवर उभे राहिला. शहजादा अजीम गडाच्या पश्चिम बाजूस शहापूर येथे फौज घेऊन होता. औरंगजेबाच्या तोफखान्याचा प्रख्यात सरदार तबियतखान गडाच्या पूर्वेस तर दक्षिण बाजूस शिरजीखानास नाकेबंदीस ठेवले होते. वेढा इतका आवळून घातला होता की आतला माणूस बाहेर किंवा बाहेरच माणूस गडावर जाऊ शकत नव्हता.प्रयागजी गडावरून ही परिस्थिती पहात होते, त्यांनीही भराभर तोफा बुरुजांवर चढवल्या, गस्त ठेवून गड जागता ठेवला. होते किती हशम वर! अवघे पाचशे! परंतु दहा हजारांची दुष्मनगिरी ते केवळ पायधुळीशी तोलीत होते.

मोगलांचे हल्ले चालू झाले. तोफा गर्जू लागल्या, वर डोंगर छाती काढून तोफांचे गोळे झेलीत होता. मोगलांच्या छावण्यांवर अकस्मात चालून जाऊन ओरबडे काढण्याचे काम रात्री बेरात्री सुभेदारांनी बेकादार चालू ठेवलं होतं. पंतप्रतीनिधी परशराम त्र्यंबकांनी साताऱ्याच्या नैऋत्तेला तीन कोसांवरील सज्जनगडावर मुक्काम ठोकला. वेढ्याला दोन महिने लोटले तरी प्रयागजी रेसभर ढळले नव्हते; पण गडावरच धान्य कमी होत होतं. गडाची परिस्थिती ओळखून असलेल्या पंतप्रतिनिधींनी आपला मुतालिक शहजादा आजींकडे पाठवला.गड लवकरच खाली करतो सांगून थोडेबहुत धन्य पोहचवण्याची सवलत मागून घेतली. पंतप्रतिनिधींनी तीन महिने पुरेल इतकं ‘थोडं’ धान्य गडावर गुपचूप पोहोचतं केलं! धान्यासोबत तोंडी लावायला दारुगोळाही गडावर चढला!

मराठे आज गड खाली करतील, उद्या करतील अशी अजीम आशा करीत होता परंतु जेव्हा प्रयागजी सुभेदारांनी वरून तोफांचा दणका सुरु केला तेव्हा मात्र शहजादा अजीम खडबडून जागा झाला. दिवसामागून दिवस लोटत होते, गड काही मिळेना! शेवटी अजीमने काहीही करून तटाखाली सुरुंग ठासायचा बेत केला. तबियतखानच्या मदतीने त्याने उत्तर तटबंदीवरच्या मंगळाई बुरुजाजवळ कणखर पहाडात सुरुंग खोदण्याचे काम गुप्तरीतीने चालू केले; थोडे थोडे अंतर ठेवून अंधारात चोरून मारून तीन मातबर सुरुंग खोदण्यास सुरुवात झाली. वेढा दिल्यापासून साडेचार महिने लोटले होते; शहजादा अजीमने आता काय करामत केली आहे हे पाहण्यासाठी औरंगजेबाला बोलावले.
औरंगजेब आपल्या छावणीतून करामत पाहण्यासाठी निघा, आरसपानी अंबारीत तो बसला, मागेपुढे लवाजमा मातबर होता. उन्तावरच्या नौबती आघाडीवर झाडत होत्या, ताशे मर्फे तडाडत होते; शिंगांच्या लकेरीवर लकेरी उठत होत्या, चोपदार मोठमोठ्याने अल्काब गर्जत होते, हि टोलेजंग मिरवणूक किल्ल्याकडे निघाली. गस्तीवरील मराठ्यांनी हि नवीनच भानगड पहिली; प्रयागजी सुभेदारही तटावर ही गंमत पाहण्यासाठी आले. तटाखालील पहाडाला सव्वा सव्वा हात खोलीचे सुरुंग ठासून तयार ठेवलेले होते, प्रयागजींना या बनावाची अजिबात कल्पना नव्हती. बादशहा आला; निरनिराळ्या फौजेच्या तुकड्या अंतरा अंतरावर दबून सज्ज झाल्या. लांबवर नेलेल्या सुरुंगाच्या वातींना बत्ती देण्यात आली. तिन्ही वाटी पेटल्या, पण त्यातील एक वात सर्रर्र सर्रर्र करीत झपाट्याने पेटत गेली; दुसऱ्या वाती रेंगाळल्या.

पहिला सुरुंग उडाला, खडकाचा प्रंचड ढलपा तटासकट अस्मानात उंच उडाला! भयंकर किंकाळ्या फुटल्या, तटावरचे सगळे मराठे अस्मानात फेकले गेले, प्रयागजी सुभेदारसुद्धा किल्ल्याच्या आतील बाजूस मातीच्या ढिगाऱ्यावर उडाले. गडाखाली हल्ला करण्यासाठी सज्ज असलेले चार हजार मोंगल प्रचंड गर्जना करीत खिंडाराकडे धावले. इतक्यात धुमसत राहिल्याने रेंगाळलेल्या दुसऱ्या सुरुंगाच्या वाती सुरुंगाशी भिडल्या. धडाडधडधड! उंच शिळा अस्मानात भिरकावल्या गेल्या, डोंगराकडे धावत सुटलेल्या मोगलांवर अस्मान कोसळल्याप्रमाणे त्या शिळा कोसळल्या.

भयंकर हाहाकार उडाला! डोंगरावर पसरलेले दोन हजार मोंगल ठार झाले, हजारे जखमी झाले. हाहाकाराने गोंधळून घाबरून मोगलसेना मागे पळत सुटली. औरंगजेब ही सारी ‘करामत’ पाहून भयंकर चिडला. तो स्वतः पुढे झाला त्याने सर्व फौजेला माघारी फिरवले, उसन्या अवसानाने मोंगलफौज वर चालून जाऊ लागली. मातीच्या ढिगाऱ्यावर पडलेल्या सुभेदारांच्या अंगावर दोन शिळा कोनाड्यासारख्या कोसळल्या होत्या, प्रयागजी आत सुखरूप होते. गडावरचे मराठे ताबडतोब जमा झाले; त्यांनी घाई करून शिळा उचकटल्या व सुभेदारांना बाहेर काढले. ते बाहेर आले ते चिडूनच! त्यांनी सर्वांना वरून मोगलांवर मारा करण्यास फर्मावले.
मोंगल फौज आता मात्र जी पळत सुटली ती कोणालाच आवरेना. औरंगजेब तणतणत आपल्या मुक्कामावर चालता झाला. अजीम अगदी शर्मून गेला. आपल्या फौजेला डोकं नाही आणि आपणही योग्य त्या सूचना केल्या नाहीत, त्यामुळे आजचा भयंकर संहार उडाला याचे त्याला फारच वाईट वाटले, ‘करामत’ चांगलीच अंगलट आली! आता कसेही करून गड मिळविलाच पाहिजे, नाही तर आहे नाही ती सारी अब्रू जाईल म्हणून शेवटचे पैशाचे खणखणीत हत्यार त्याने उपसले.

पंत प्रतिनिधींनीही प्रयागजींच्या संमतीने रक्कम ठरवली व गड आजींच्या हवाली करण्याचे ठरवले. मराठ्यांचा असे करण्यात दुहेरी फायदा होत असे गड देताना सैन्यासाठी पैसा मिळे व थोड्या दिवसानंतर गडही! प्रयागजींनी गड आजींच्या ताब्यात दिला. गड मिळाला एवढाच आनंद औरंगजेबाला डोंगराएवढा झाला. अजीमने गड मिळविला म्हणून गडाला नाव दिले – अजीमतारा !

संदर्भ:
मुजऱ्याचे मानकरी – बाबासाहेब पुरंदरे
चिटणीस बखर
जेधे शकावली
किंकेड पारसनीस खंड १ ला.

मोगल म्हणजे भोंगळ! आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा! दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता! लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच! औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला यांना कसं अगदी मनाजोगं गिऱ्हाईक मिळालं होतं! सातारा व परळी या सुभ्याचा अंमल फार पूर्वीपासून एक कणखर छातीचा व अतुल निष्ठेचा स्वराज्य सेवक पहात होता. प्रयागजी प्रभू हे त्यांचं…

Review Overview

User Rating !

Summary : शिवरायांचा पराक्रम अजिंक्यतार्याने पाहिला आणि तसं त्यांचे आजारपणही सोसले, औरंगजेबाचा हल्ला त्याने जसा झेलला तसाच किल्लेदार प्रयागजी प्रभू याची चिवट झुंजही अनुभवली. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेकही पाहिला, मराठी साम्राज्याचे ऐश्वर्यही पाहिले आणि सातारची गादी खालसा करताना इंग्रजांनी आपल्याच धन्याचा केलेला अवमानही त्यानेच भोगला.

User Rating: 4.44 ( 9 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.