Home » शिवचरित्र » छत्रपती शिवाजी महाराज » दक्षिण दिग्विजय मोहीम
शिवराय कर्नाटक मोहीम - Shivray Karnatak Mohim
शिवराय कर्नाटक मोहीम - Shivray Karnatak Mohim

दक्षिण दिग्विजय मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” !!

त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.

दरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.

ह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”

ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.

महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.

दक्षिण दिग्विजय मोहीम मार्ग नकाशा- Dakshin Digvijay Route Map

महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.

आताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच त्याने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण आयताच मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन किल्ला महाराजांच्या हवाली केला. किल्ला ताब्यात येताच किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा खंदक आहे आणि किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. महराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ टेकडीवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही.

ह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल. म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार होतो. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली आहे असे सांगितले होते, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची म्हणजेच व्यंकोजी राजांची भेट घेतली. साहजिकच त्यांनी जहागीरीतील महाराजांचा अर्धा हिस्सा धुडकावून लावला. मग पुढे महाराजांनी तो प्रदेश युद्ध करून जिंकून घेतला.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेध घालून अरणी जिंकली त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

दक्षिण दिग्विजय मोहीम मार्ग सांगता नकाशा - Dakshin Digvijay Return Journey Map

ह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

लेखाचे संदर्भ :
– शिवराय दक्षिण दिग्विजय – सुहास झेले
– दक्षिण दिग्विजय – मुकुंद जोशी
– जनसेवा समिती विलेपारले ह्यांचा अभ्यासवर्ग (१६ डिसेंबर २०१२) यांची संदर्भपुस्तिका
– अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच,…

Review Overview

User Rating!

Summary : महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते. औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

User Rating: 4.46 ( 19 votes)

2 comments

  1. Anvesha Bhosale

    thanks

  2. Haresh Bhandarkar

    खुप छान माहिती आहे जी आज पर्यंत मला माहित झाली नाही मी 1997 ला इतिहास विषय घेऊन पास झालो TYBA त्या इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला ही माहिती नाही

    आता तो काय शिकवतोय माहिती नाही पण जर इतिहास विषय शिकवत असेल तर त्या ने हे वाचावेसे वाटतें

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.