छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या पोर्तुगीजांशी तह पूर्ण झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत त्यांच्याकडे रवाना केला. औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सुचना केली. गोव्याच्या फिरंग्याना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते, त्यात त्यांना कुडाळच्या सावंताची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसायांची फूस होतीच, म्हणुनच संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरविले.
फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम ६०० मराठ्यांची शिबंदी होती तर २०० जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते.
१ नोव्हेंबर १६८३ रोजी विरजई आल्वोरने फोंड्याला मोर्चे बांधले, ३ तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रीगो द कोस्त हा हल्ला चढवत होता, दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा अभेद्य तटबंदीचा किल्ले फोंडा एकही चिरा ढळत नसल्याचे पाहून विजरेईने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून मारा सुरु केला. आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली; पण पाऊसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते, त्यात किल्ल्यातील मराठे सुद्धा तडफेने प्रतिकार करीत होते.
एके दिवशी पोर्तुगीज सैनिक किल्ला चडून वर आले आणि तोफांच्या सरबत्तीमुळे पडलेल्या भगदाडातुन आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी येसाजी, कृष्णाजी कंकांनी असे काही रणकंदन माजविले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच पण तटाला झोंबलेले फिरंगी सुद्धा माघार घेऊ लागले. एकास चार असे शत्रु मराठे अंगावर घेऊ लागले. कृष्णाजी कंकांनी तर असे काही शौर्य दाखविले की शत्रु सैनिक आवाक झाले. किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि पोर्तुगीज किल्ला घेणार इतक्यात १००० घोड़दळ आणि तितकेच पायदळ घेउन संभाजी महाराज फोंड्याच्या मदतीस आले. महाराजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांना सुद्धा चेव आला. आता मात्र गोवेकरांची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली.
संभाजी महाराजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते, विरजईने माघारीचा हुकुम देताच त्याचे सैनीक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळु लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडेस्वारांनी माघार घेउन दौडत्या शत्रूस गाठले. मोर्चे धरलेल्या बंदुका कडकडल्या तशी मावळी घोडी बिचकुन मूस्काटे फिरवू लागली. ते पाहुन येसाजी पुत्र कृष्णाजी चालून गेले, शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत झाले; घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या मा-यातुन खुद्द विरजई नशिबाने सलामत निसटला होता. कित्येकजण नदितुन पोहत होते, कित्येकजण गळाभर पाण्यात जिव मुठीत धरुन उभे होते. भेदरलेल्या विरजईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहीली होती.
अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागुन मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळयाच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा, घामेजलेला कृष्णाजी कंक छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येवुन घोड्यावरुन कोसळले.
पिता येसाजी कंक ही जायबंदी झाले होते त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना कांबळ्यावर आणुन ठेवले.
आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारेही थांबली होती.
संभाजी महाराज घोंगडिवर झोपविलेल्या येसाजीजवळ आले. त्यांना बघुन क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले,
“सुक्षेम हाईसा न्हवं?”
काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडिजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती कृष्णाजी ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. आईच्या मायेने हात फिरवित महाराज म्हणाले,
ऐसा कैसा रे फुटोन गेलास तु कृष्णा !
संभाजी महाराजांनी पिता पुत्रांना कराडला त्यांच्या गावी पोहचवण्याची आज्ञा केली.
या युद्धात येसाजी कंक कायमचे जायबंदी झाले होते तर कृष्णाजी कंक यांना वीर मरण आले.
संदर्भ:
पोर्तुगीज पत्र, रियासतकार आणि डॉ. पिर्सुलेकर लेख
Review Overview
User Rating !
Summary : नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदराच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांडे यांची मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजिराच्या कोंडाजी फर्जंदांची आठवण व्हावी असाच हा प्रसंग होता गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा.
Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj


आपला हा दुर्दैव आहे की आपला हा इतिहास पुस्तकं मध्ये नाही आहे . पुस्तकं मध्ये असता तर आपल्या महाराजांची कथा , शुर , ताकत , बुधी आणि दहशत लोकांना , छोट्या पोरांना आणि पुढील पिढी ला कळी अस्ती . पण तुम्ही लोकांना या मोबाईल चा मदतीने सांगत आहे खूप भारी वाटा आपल्या महाराजांना बदल वाचायला . आणि मी विनंती करतो की अजून नवीन नवीन पोस्ट टाकत जावा वात बागतोय मी नवीन गोष्टी वाचायला