Home » मोडी शिका » मोडी लिपी काय आहे?

मोडी लिपी काय आहे?

मोडी लिपी - Modi Lipi मोडी लिपी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये मराठीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.

मोडी लिपीचा इतिहास

मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही.

मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात. देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.

मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे.
१) हे बहु असो पंडीतु, धरुणु बालकाचा हातु, वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥ (ज्ञानेश्वरी अध्याय १३, ओवी क्र.३०७)
२) सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३, ओवी क्र.३४६)
३) दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ४, ओवी क्र.५२)
४) आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ८, ओवी क्र.१७४)

इ.स. १८०१ मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ, श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.
‘रघु भोसल्यांची वंशावळी, ‘मराठी भाषा व्याकरण’,’मराठी कोष’, ‘नवा करार’ (१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.

ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे – यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.
यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.

कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात नस्तलीक मधून शिकस्ते लिपी जन्मास आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे. गुजराथी आणि बंगाली भाषा या सुरुवातीला देवनागरी लिपीत लिहिल्या जात, परंतु तेथील भाषाभिमान्यांनी हट्टाने वेगळ्या लिपीची उभारणी करून ती वापरण्यास सुरुवात केली.

मोडी वळणे

चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी.

मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.

सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर, तामिळनाडू
कॉनेमारा ग्रंथालय, मद्रास युनिव्हर्सिटी, चेन्नई, तामिळनाडू
संग्रहालय: लंडन, पॅरिस, नेदरलँड्स, स्पेन वगैरे
भारत इतिहास संशोधक मंडळ ,पुणे
राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

मोडीचे प्रशिक्षण व पुस्तके

मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक – ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.
जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते.
या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.

संदर्भ: Wikipedia मोडी लिपी

मोडी लिपी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये मराठीच्या विपरीत, काना खालून वर…

Review Overview

User Rating !

Summary : शिवरायांची असंख्य हुकूमनामे, न्यायनिवाडे, मुद्रा, आज्ञापत्रे आपल्याला विविध प्रकारची माहिती देऊ शकतात; मात्र हे सर्व लिखाण मोडी लिपीत असल्याने या लिपीच्या जाणकारांची आदर्श समाजउभारणीच्या कार्यासाठी गरज आहे. शिवरायांच्या चरित्राची, त्यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती भूमिका जेव्हा समाजापुढे येईल तेव्हा आमच्या राज्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्यातील कुपमंडुक वृत्तीचे केवळ ज्ञान होऊन समाजविधायक कार्य पुन्हा उभे करता येईल.

User Rating: 3.12 ( 10 votes)

5 comments

  1. PANDURANG GOVIND DHAGE

    sir Ahmednagar madhye pragat modi shikanyachi soy aahe ka
    aslyas contact number dya.

  2. PANDURANG GOVIND DHAGE

    Sir Ahmednagar madhye pragat modi shikanyachi soy aahe ka
    aslyas contact number dyava.

  3. pravin shete

    छान आहे माहिती खूप धन्यवाद

  4. अत्यंत उत्कृष्ठ माहिती,सुटसुटीत समजण्यास सोपी, तसेच उत्कन्ठ्ता वाढविणारी माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

modi letter AE - मोडी अक्षर ए / ऐ

मोडी वाचन – भाग ६

मोडी अक्षर ए/ऐ – (Modi Letter AE)