Home » महाराष्ट्रातील किल्ले » दौलतमंगळ – Daulatmangal Fort

दौलतमंगळ – Daulatmangal Fort

दौलतमंगळ (Daulatmangal)
किल्ल्याची ऊंची : 2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला “दौलतमंगळ गड” हे नाव पडले असावे.

पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.

इतिहास :
पौराणिक आख्यायीके नुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होउन येथुनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादवांनी केली.

१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशाहाच्या पदरी राहाण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले. युध्दाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावने पुण्यावर हल्ला करुन पुणे उध्वस्त केले. त्यावरुन गाढवाचा नांगर फ़िरवला.

मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.
पहाण्याची ठिकाणे :
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे – हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या पाटाच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाटमार्गाने पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.

राहाण्याची सोय: गडाचा,मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.
पाण्याची सोय: पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: यवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.

साभार: ट्रेक क्षितीज संस्था

दौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी पुणे - सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला "दौलतमंगळ गड" हे नाव पडले असावे. पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ…

Review Overview

User Rating

Summary : आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता.

User Rating: 3 ( 9 votes)

One comment

  1. Jay shivray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.