हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे आज ६ जून २०२३ रोजी युवराज संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्तिथीत तसेच तिथीनुसार (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी राजधानी रायगड येथे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला.
देशभरातून ११०८ विविध ठिकाणांहून आणलेल्या पवित्र जलाने यावेळी शिवछत्रपतींना जलाभिषेक तसेच ३५० सुवर्ण होनाने छत्रपतींना सुवर्णाभिषेक देखील करण्यात आला. राज्याभिषेकानंतर शिवरायांच्या पालखी सोबत जाऊन जगदीश्वर महादेव व महाराजांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. किल्ले रायगड आणि परिसर ढोल ताशांच्या आवाजाने निनादून गेला. मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण रायगडाचा साज वाढवला होता.शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त दोनही दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्या नंतर कोणीही गड उतरण्यासाठी गडबड करु नका. चोर वाटांचा वापर करु नका. अशा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन समितीच्या स्वयंसेवकांनी वेळोवेळी केले होते.
युवराज संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने रायगडच्या घेऱ्यातील २१ गावांच्या मूलभूत सुविधांचा व प्राधिकरणाच्या वतीने मागील तीन वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. पंदेरी, दापोली, मांगरुण, देवघर, पाने, वाघेरी, वारंगी, बावळे, निजामपूर, टकमकवाडी या गावांना वेळोवेळी भेटी दिल्या. यातील काही गावांमध्ये आजतागायत पक्के रस्ते झालेले नव्हते, परंतु रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावांत पक्के रस्ते झाले आहेत. पाचाड येथे शिवभक्तांच्या निवाऱ्यासाठी धर्मशाळा उपलब्ध होणार आहे. पाचाड येथे बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या धर्मशाळेची दुरुस्ती रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली असून, यामध्ये शिवभक्तांच्या निवाऱ्याची सोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच रायगड घेऱ्यातील सर्व गावे किल्ले रायगडास रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. यातून पर्यटनाला चालना मिळून, स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
Review Overview
User Rating !
Summary : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न