मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.
मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे. १९५० पर्यंत शालेय अभ्यासक्रमात मोडी लिपीचा अंतर्भाव होता. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना क्रमानं अवघड होत जाणाऱ्या वाचन मालिका अभ्यासायला असत. आता त्या केवळ दुर्मिळ ग्रंथ म्हणून समजल्या जातात. एके काळी मोडी लिपी दैनंदिन जीवनात वापरली जात होती. जमाखर्च, रोजनिशी, पत्रव्यवहार, सरकारी नोंदी, याद्या, स्मरणं इत्यादींची टिपणं मोडीतच असत. मोडी लिपीची सुरवात बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या वैभवशाली काळात झाली. हेमाडपंत नावाचा यादवांचा प्रधान होता, त्यानं ही लिपी सुरू केली असं मानलं जातं. देवनागरी लिपीत अक्षरं लिहिताना लेखणी वारंवार उचलावी लागते व लिखाणाचा वेग मंदावतो. पूर्वीच्या काळी सर्वच व्यवहार हातानं लिहूनच होत असत म्हणून सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यांतील पत्रव्यवहार जलद गतीनं व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करून त्यानं ही नवी लिपी तयार केली. हिची भाषा मराठी आहे; परंतु लिपी मोडी. एकसंध रेषा काढून तिच्याखाली बोरूनं सलग अक्षरं लिहिली जात असत. या लिपीतील काही अक्षरं देवनागरी अक्षरांप्रमाणे आहेत. ऱ्हस्व-दीर्घादि फरक व विरामचिन्हं नसल्यामुळं जलद गतीनं या लिपीत लिखाण करता येतं. परंतु मजकुरातील शब्द सलग लिहिलेले असल्यामुळे तो कोठे तोडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे ठरविणं सुरवातीला कठीण जातं, तथापि मोडीवाचन हा मुख्यतः सरावाचा भाग आहे.
काळानुसार मोडी लिपीचे शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन व उत्तर पेशवाई किंवा ब्रिटिशकालीन असे ढोबळ प्रकार दिसून येतात. शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन मोडी कागदपत्रं त्यातील जुनी भाषा आणि काही पर्शियन शब्दांच्या वापरामुळं वाचावयास कठीण असत. परंतु पेशवेकालीन मोडीतील बरंचसं लेखन हे सुबक, घोटीव, रेखीव आणि लपेटदार असल्यामुळं वाचनास सुलभ जातं. अव्वल इंग्रजी काळात बोरूची जागा टाकानं घेतल्यामुळे अक्षरांचा आकार लहान झाला व वाचन बरेचसं क्लिवष्ट झालं. इतिहास स्वतः वाचून खात्री करायची असेल, इतिहासाची मूळ अस्सल साधनं पाहावयाची, सखोल अभ्यासावयाची तर मोडी उत्तम प्रकारे आत्मसात करणं आवश्य क ठरतं.
ऐतिहासिक काळात विकसित होत होत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली ही मोडी सध्या दुर्लक्षित झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाकरिता राज्यातील दफ्तरखान्यात आणि संशोधन संस्थांमध्ये धुळीच्या साम्राज्यात असलेल्या लाखो ऐतिहासिक कागदांचं वाचन होणं आवश्यनक आहे. हे कागद प्रामुख्यानं मोडी, फारसी लिपीतील आहेत. राज्यात मोडीचे उत्तम जाणकार पंचवीसच्या वर नाहीत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानातील ज्या ज्या प्रांतात मराठ्यांची सत्ता पोहोचली आणि स्थिरावली अशा बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर, म्हैसूर आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मोडी कागदपत्रं आढळतात. याशिवाय खासगी संशोधन संस्था आणि व्यक्तिगत संग्रह यामधील कागदपत्रांची संख्या पुष्कळ आहे. पुणे पुरालेखागारात पेशवे काळातील सर्वात जास्त कागदपत्रांचा संग्रह आहे. १५९० ते १८६५ म्हणजे सुमारे २७५ वर्षांच्या कालावधीतील निरनिराळ्या विषयासंबंधीचं वर्गीकरण केलेले ३९ हजार रुमाल (रुमाल म्हणजे एके ठिकाणी सुमारे एक हजार ते बाराशे कागद) म्हणजे सुमारे ४ कोटी कागद आहेत. त्यात शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, आंग्रे दफ्तर, जमाव दफ्तर, इनाम कमिशन, डेक्कन कमिशन असे विभाग असून, दैनंदिन हिशेब, पेशव्यांच्या रोजकिर्दी, सरकारी खजिन्याचे हिशेब, देणग्या, बक्षिसं, महसूल, तोफखान्याच्या संबंधीच्या खर्चाचे हिशेब, संस्थानिकांची माहिती, वतने, इनामे, मुलखाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची माहिती इत्यादी बाबींच्या नोंदी आहेत.
मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणी मोडी कागद मोठ्या प्रमाणात आहेत.
भारत इतिहास संशोधन मंडळात १५५० ते १९०० या कालावधीतील १५ लाख मोडी कागद आहेत. त्यात रास्ते, मेहेंदळे, पुरंदरे, पटवर्धन, दाभाडे, नगरकर या सरदारांची दफ्तरे, तसेच निरनिराळ्या संशोधकांनी ठिकठिकाणाहून आणलेली कागदपत्रेही आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी मोडीतील अस्सल साधने प्रसिद्ध करण्याची परंपरा निर्माण केली. वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी मिरज मळ्यातील १८९६ ते १९२७ या कालावधीतील जवळजवळ ८ हजार कागदांतून ऐतिहासिक लेखसंग्रह या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ पानिपतोत्तर मराठी इतिहासाबद्दल आजही प्रमाणभूत मानला जातो. शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वा. पोतदार, स. ग. जोशी, द. वि. आपटे, पां. ना. पटवर्धन या संशोधकांचं इतिहासाप्रती असलेलं योगदान अलौकिक असंच आहे. जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protoco) आणि संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४००० कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग मोडी समजून घेण्यासाठी होतो.
हे सर्व ज्ञानभांडार अभ्यासकांची, वाचकांची वाट पाहात आहे. परंतु दुर्दैवानं मोडी लिपीच्या शिक्षणाची सोय मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही. पुणे पुराभिलेखागार आणि भारत इतिहास संशोधन मंडळ या दोन्ही संस्थांमार्फत मोडी अभ्यास वर्गांचं आयोजन अत्यंत माफक शुल्क आकारून केलं जातं. या संस्थांमध्ये शिकण्याचा फायदा असा, की मोडी लिपीतील अधिकृत कागद वाचावयास व पाहावयास मिळतात. भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे दर दीड ते दोन महिन्यांनी मोडी अभ्यास वर्ग घेतला जातो. कागद वाचताना काही अडल्यास ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं मार्गदर्शन मिळतं.
इतिहास संशोधनाच्या आणि प्रामुख्यानं मोडी कागद वाचण्याच्या क्षेत्रात पुढे येणाऱ्या अभ्यासकांसाठी व ज्यांना मोडी शिकल्यानंतर मोडी वाचावयास येण्याची इच्छा आहे; परंतु काही कारणांनी ते मंडळामध्ये रोज वाचनाकरिता येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मी व मंदार लवाटे यांनी सोपी मोडी पत्रे हे पुस्तक तयार केलं आहे. पुस्तकात डाव्या बाजूला मोडी पत्र व उजव्या बाजूला पत्राचं देवनागरीतील लिपीतील रूप व कठीण शब्दांचे अर्थही दिलेले आहेत.
मोडी कागदपत्रांत लढाया, मोहिमा, राजकीय घडामोडींबरोबर आजही मनोरंजक वाटेल अशी त्या त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, सण-समारंभ, उत्सव यांची तपशीलवार माहिती दिसून येते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची वस्त्रे- त्यात स्त्रियांच्या शालू, पैठण्यांपासून पुरुषांच्या पागोटे, फेटा, विजार, अंगरखा इत्यादींचे दर आणि ती वस्त्रं कोठून आणली जात त्याचीही माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे पायाच्या बोटापासून डोक्यांपर्यंत म्हणजेच नखशिखांत वापरात असलेले स्त्रियांचे बाळ्या, बुगड्या, गोठ, पाटल्या, नथ, पैंजण, मूद, राखाडी; तसेच पुरुषांचे कंठा, भिकबाळी, चौकडा, पोहोची, अंगठी आणि लहान मुलांचे हसळी, बिंदली, गोठ असे असंख्य प्रकारचे सोन्याचे, चांदीचे, जवाहिरी, मोत्याचे दागिने त्यांचे दर व वजनासह माहिती पाहावयास मिळते. निरनिराळ्या सणांना, व्रतांना, पूजांना करण्यात आलेले विविध पदार्थ, त्यात वापरले जाणारे साहित्य, त्यांचे दर याच्याही नोंदी आहेत. विविध देवदेवतांच्या मूर्ती, त्यांना केलेले सोने, चांदी, हिरे, मोती, वैडुर्य, पुष्कराज, हिरकण्या यांनी जडविलेले दागिने यांचेही वर्णन पाहावयास मिळते. याबरोबरच पागा, पीलखाना, उष्ट्रखाना, रोजच्या वापरात असलेल्या सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड इत्यादींपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती, त्यांची वजने, दर याही नोंदी आढळतात. विषयानुरूप संशोधन करण्यासाठी अशा कागदांचा अभ्यास करणं आवश्यवक आहे.
भारताचा मध्ययुगीन आणि विशेषतः मराठी इतिहासास उपयुक्त असा राजकीय- शासकीय व्यवहार, न्यायालयीन कागद, सावकारी किंवा जमीन-जुमल्यांच्या संदर्भातील कागद, कालनिर्णय इत्यादी अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांची जाण मोडी लिपीच्या अभ्यासाच्या आधारानंच होऊ शकेल.
मोडी लिपी हा आपला परंपरागत असलेला अमूल्य ठेवा आहे. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील पुराभिलेखागारात आज मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे लाखोंच्या संख्येनं नव्या अभ्यासकांची अजून वाट पाहात आहेत. त्यांच्या अभ्यासानं इतिहास आणि संस्कृतीत फार मोठी भर पडू शकेल. परंतु मोडी वाचकांची संख्या मात्र पाहिजे तशी वाढत नाही. ही संख्या वाढली नाही आणि नवे अभ्यासक पुढे आले नाहीत तर इतिहासाच्या या महत्त्वाच्या साधनसामग्रीचा कालौघात नाश होईल. ज्या ज्या महान संशोधकांनी या क्षेत्रात प्रचंड कार्य केलं ते अतुलनीय आहेच; परंतु कागदपत्रांची संख्या पाहता हे काम अजून बरेच शिल्लक आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल, इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी असलेलं तिचं नातं अबाधितच राहील यात शंका नाही. गरज आहे ती या लिपीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मंडळींची; कारण आपला इतिहास समजून घेण्याचा हा राजमार्ग आहे.
मोडी शिकणाऱ्यांसाठी
मोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा. मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे.
– सौ. भास्वती सोमण ([email protected])
साभार: सकाळ टाईम्स
Review Overview
User Rating
Summary : मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.
नमस्ते, मोडीचा वर्ग करुनही सराव नसल्याने पुनः अवघड होते आहे, काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे. सुहास मधुकर जोशी, कोल्हापूर
सुहास सर तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, सरावाशिवाय मोडी येणार नाही. इंटरनेटवर खूप सारी पत्रे उपलब्ध आहेत त्याचा सराव करू शकता, उपल्बध पुस्तकातून सराव चालू ठेवू शकता. धन्यवाद
माझ्याकडे काहि मोडि कागद पत्रे आहेत. ते मला वाचुन भेटेल का…?
मला मोठी लिपी कशी शिकता येईल मी जबलपुर ला असतो काही पुस्तके आहे का
मोडी शिकण्यासाठी किती कालावधी लागेल.
मला मोडी वाचाला शिकयाचे आहे. कधी चालू होईल
I want to learn moli
In Thane where classes
मला पण मोडी लिपी शिकायची आहे.मी सध्या पुण्यात आहे मला कशी व कोठे मोडी लिपी शिकता येईल त्याचे मार्गदर्शन करावे…
भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ मध्ये (भरतनाट्य मंदिर शेजारी ) चौकशी करावी, प्रारंभिक वाचन लेखन आणि ऐतिहासिक दस्तऐवज यांची संपूर्ण माहिती तिथे मिळू शकेल.
श्री कौस्तुभ कस्तुरे यांच्या android app चे नाव काय
Itihaas Mitra
भारत इतिहास सशोधन मंडळाचा पत्ता मला मिळल का माझा मोबाईल नंबर ९६८९२१७४१३ वर मॉसेज करा
मी पण मोडी शिकायला सुरुवात केली आहे,
कठीण शब्दांचे अर्थ समजून घेणे अवघड जाते.
मोडी लिपी जाणकार एखाद्या व्यक्तीचा व्हाॅटस अप नंबर मिळेल का
नंदकिशोर पाटील,
शिरटी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
मो. 8600019151
श्री परशुराम चव्हाण: ८६००९१००९१
श्री कौस्तुभ कस्तुरे यांच्या Android App वरून देखील मोडी शिकता येईल.
In Thane where classes
मला कसतुरेंचा app कसा समजेल
मोडी लिपीचे महत्व आपणा सर्वांना ठाऊक आहेच परंतु ही लिपी वाचविण्यासाठी पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व खूप खूप धन्यवाद. मंडळाच्या या प्रयत्नांना योग्य अशी साथ देऊन बहुसंख्येने मोडी लिपी शिकावी जेणेकरून आपल्या जाज्वल्य इतिहासातील घटना आपण समजू शकू असे मला वाटते. याचाच भाग म्हणून मीदेखील सादर मोडी वर्गांसाठी अर्ज करणार आहे.
मंडळाचे पुनःश्च आभार !!!