Home » शस्त्रास्त्रे » मराठी भाले
Maratha Javelin - भाले
Maratha Javelin - भाले

मराठी भाले

भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई. प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई; मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे भाल्याला कमीअधिक महत्त्व मिळे. ग्रीक व मराठे यांना भाला अतिप्रिय वाटे. आर्यमित्र औदुंबर (इ. स. पू. दुसरे-पहिले शतक), अयोध्येचा आर्यमित्र, जेष्ठमित्र (इ. स. पू. पहिले शतक), कार्तिकेय (उज्‍जयिनी) व यौधेयांच्या नाण्यांवर भाले आढळतात; तर इंडो – ग्रीक, इंडोपार्थियन व इंडो-बॅक्ट्रियन यांच्या नाण्यांवर प्रामुख्याने भालेच दिसतात; तसेच कुशाणाच्या व गुप्ताच्या नाण्यांवर आणि लेण्यांतील चित्रे व मूर्तिशिल्पे यांतही भाले आढळतात. कालिदासाच्या रघुवंशात भाल्याची वर्णने आहेत. शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली. पहिल्या जागतिक महायुद्धात (१९१४-१९) ⇨ घोडदळ निष्प्रभ झाल्यामुळे भाले प्रचारातून गेले. भारतात १९२७ सालापर्यंत एक परंपरा म्हणून घोडदळाकडे भाले होते. सांप्रत भारताच्या राष्ट्रपतींचे शरीररक्षक घोडदळ राष्ट्रीय समारंभप्रसंगी भाले मिरवतात.

भाल्याचे प्रकार: मुख (हलमुख) किंवा डोके (फाळ), दंड आणि पार्श्व किंवा पादत्राण असे भाल्याचे मुख्य तीन भाग असतात. मुखाच्या अग्राने खुपसता येते. दंडाच्या एका टोकांवर मुख व विरूद्ध टोकांवर पादत्राण बसवितात. मुख ते पार्श्व धरून भाल्याची जास्तीत जास्त लांबी ७ मी. आढळते. डोक्याची लांबी ७५ सेंमी. पर्यंत असते. भाल्याचा फाळ दगडाचा, हाडाचा किंवा धातूचा असतो. दंड गोल असून लोखंडाचा किंवा बाबूंचा असतो. पादत्राण लोखंडी असते. भाल्याच्या पादत्राणाचे टोक जमिनीत खुपसून व भाला उभा किंवा तिरपा धरून भाला-तटबंदी उभी करण्यात मराठा राऊत पटाईत होते.

फेकण्याचे, हातातले व मिश्र बहुकामी असे भाल्यांचे तीन वर्ग आहेत. भालाधारी सामान्यतः चिलखत व ढाल वापरत असे. प्राचीन वैदिक वाङ्‍मयात व राजनीतीपर ग्रंथांत भाल्याच्या संदर्भात कुत, तोमर, शूल, शल्य, प्रास, भल्ल, मुक्तत, शक्ती, शक्र व त्रिशूळ इ. अनेक नावे आढळतात. कौटिलीय अर्थशास्त्रात वरील नावांबरोबर हाटक, वराहकर्ण, कणय, कर्पण व त्रासिक अशी नावे आढळतात. ही वेगवेगळी नावे भाल्याच्या मुखाच्या शिल्पावरून व वापरण्याच्या पद्धतीवरून पडली असावीत. उदा., भल्ल हा हातात धरण्याचा; शल्य, प्रास व त्रासिक हे फेकण्यासाठी आणि त्रिशूळ व शक्ती हे बहुकामी खुपसण्यासाठी तसेच घोडेस्वाराला खाली ओढण्यासाठी-भाले होत.

ज्या शस्त्राच्या मूळ शिल्पात कालपरत्वे मुळीच बदल झाला नाही, असे भाला हे एकमेव शस्त्र आहे. प्राचीन काळी झाडाची सरळ फांदी तोडून, तिचे एक टोक अणुकुचिदार करून व ते अग्‍नीत घालून टणक करीत. पुढे भाल्याच्या फाळात व दंडात फरक होत गेले. सिंधू संस्कृतिकालीन भाल्यांचे फाळ तांब्याचे असून ते सरळ धारेचे किंवा काटेरी असत. वैदिक काळात भाल्यांना फारसे महत्त्व नव्हते. मरूतांकडे प्रास वगैरे प्रकारचे भाले असत. रामायणकालात प्रास म्हणजे फेकण्याचा भाला वापरात होता. महाभारतातील उल्लेखावरून कंबोज, गांधार येथील घोडेस्वार भालाईत होते. मौर्यांच्या सेनेतील रथी प्रास, धनुष्यबाण इ. विविध शस्त्रे वापरीत. हीच प्रथा पुढे चालू राहिली. रथ जाऊन त्यांच्या जागी घोडेस्वार आले. अजिंठा लेण्यांतील चित्रांवरून पायदळ व घोडेस्वारांचे भाले आखूड व लहान फाळाचे दिसतात. ते बहुधा फेकण्यासाठी असावेत. पदाती भालाईतांच्या ढाली लंब चौकोनी दिसतात. अशाच ढाली अ‍ॅसिरियन सैन्यातही होत्या. उत्तर हिंदुस्थानपेक्षा दक्षिण हिंदुस्थानात भाल्यांना अधिक महत्त्व दिले जाई. चोल राजवटीत भाला व शुभ्र छत्री देऊन शूरांचा सन्मान केला जाई. मोगल सैन्यात सिनान, नेझा, बर्छा, सांग भाला, बल्लम, पंजमुख इ. नावांचे भाले वापरले जात. सांग हा संपूर्ण लोखंडी भाला ८ फूट (सु. २.४४ मी.) लांब असून त्याचे डोके अडीच फूट (सु. ०.७६ मी.) लांब असे. नेझा ३ ते ४ मी. लांबीचा असून त्याचा फाळ आखूड असे. घोडेस्वार याचा उपयोग करीत. तैमूरलंगाचा झाफरनामा, अबुल फज्लचा आइन-इ-अकबरी व महमंद कासीम औरंगाबादी याचा अहवाल-उल-खवाकिन इ. ग्रंथांत अरबी-मोगली भाल्यांविषयी माहिती मिळते.

मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. मराठा भालाधाऱ्यांना इटेकरी किंवा विटेकरी म्‍हणत. मराठा पायदळ व घोडदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते. इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. हे आयुध साधारणपणे ४ ते ४.५ मीटर लांब असे. इटा व बर्च्छा हे बहुधा संपूर्ण लोखंडी व पोलादी असत. इटाला दोरी बांधून फेकण्याचा पल्ला वाढवीत व तो परत माघारी खेचीत. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत महाराजांच्या पाठोपाठ इटेकरी असत आणि नंतर इतर सैनिक चालत. संरक्षणासाठी मराठे राऊत पायउतार होऊन भाल्यांची तटबंदी उभारीत. मुसलमान बखरकार मराठा इटेकऱ्यांना ‘गनीम-इ-लाभ’ (शापग्रस्त शत्रु) व ‘नैझ-बाज’ (पट्टीचे भालाधारी) म्हणत. मराठयांच्या भालाधारी घोडदळाची नक्कल स्किनर या अँग्लो-इंडियन अधिकाऱ्यांनी एकोणिसाव्या शतकात केली. आजही स्किनर्स हॉर्स हे घोडदळ विख्यात आहे. शीख सैनिकांचे भाले २.५० ते ५ मी. लांबीचे असून त्यांना बांबूचा, लोखंडी किंवा पोलादी दंड असे. बर्च्छा हा शीख घोडेस्वारांचा विशेष आवडता प्रकार होय. भाल्याचे पाते ३० सेंमी. लांब असे गुरू गेविंदसिंग एक बर्च्छा व एक भाला जवळ बाळगीत. राजपूत योद्धे नेझा, बर्च्छा आणि भाला वापरीत. हळदीघाटाच्या लढाईत भाल्याचा प्रभाव दिसून आला. ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश रियासतीत, भाल्यांची हिंदुस्थानी परंपरा चालू होती; परंतु पायदळ भाले वापरीत नसे. घोडदळात भालाईत रिसालेच भाला, तलवार व पिस्तुल वापरीत. घोडदळातीस पहिल्या पंक्तीतील सर्व घोडेस्वार भालाईत असत. भालाईत घोडेस्वारांचा मोठा दरारा असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भाल्याची पाती चौधारी असत. भाल्याचे दंड हिंदुस्थानी शाही किंवा टोंकीन (इंडोयाचना) बांबूचे अथवा पोलादी नळीचे असत. भालाईत डोळ्याला पटका बांधीत व अंगात अत्खलक घालून त्यावर कमरबंद बांधीत विसाव्या शतकारंभी घोडेस्वारांच्या भाला व तलवारी काढून त्यांना बंदूका देण्यास काही वरिष्ठ सेनापतींचा विरोध होता. डिसेंबर १९२७ मध्ये भारतीय घोडदळातील भाले काढून घेण्यात आले. जपानी सैन्यात भाले नव्हते. १९४५ सालापूर्वी यूरोपात जर्मनी व पोलंड भालाईत घोडदळाबद्दल विशेष प्रसिद्ध होते. १८९० मध्ये जर्मन सम्राट दुसरा विल्यम याने जर्मनीचे सर्व त्र्याण्णव रिसाले भालाईत केले. जर्मनीच्या घोडदळाची नक्कल ग्रेट ब्रिटनने केली. यूरोपात पहिल्या महायुद्धानंतर घोडदळाच्या अस्ताबरोबर भाल्यांचाही अस्त झाला. अमेरिकेत भाले वापरातच नव्हते.

प्राचीन ग्रीसच्या सैन्यात ‘हॉपलाइट’ पायदळ ३ मी. ते ६.५० मी. लांबीचे ‘सारिसा’ भाले आक्रमण व संरक्षणासाठी आणि घोडेस्वार ३ मी. लांबीचे भाले फेकण्यासाठी व द्वंद्वयुद्धासाठी वापरीत. ग्रीक घोडेस्वारांना रिकीब माहीत नव्हती. इराणी घोडेस्वार भालाफेकीसाठी प्रसिद्ध होते. अँसिरियन सैन्यात मोठ्या प्रमाणावर भालाईत घोडेस्वार व पायदळ होते. भाल्यांची पाती लोखंडी व काशाची असत. अरब आणि तुर्की घोडेस्वार व उंटस्वार उत्तम भालाईत व धनुर्धारी होते, चिनी सैन्यात भाला प्रिय नव्हता; त्यांची धनुर्बाणावर भिस्त होती.

लढाईत भालांचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जाई. प्राचीन काळी, अगदी आघाडीला लांब भाले घेतलेल्या सैनिकांच्या रांगा असत. त्यांचा उपयोग संरक्षणासाठी होई. रथाच्या मागे व मध्ये पायदळ भालेकरी असत. ‘प्रास’ म्हणजे फेकता येण्यासारखे भाले घेतलेले पायदळ प्रासिक घोडेस्वारांच्या मागे असत. भालाईत घोडेस्वार बगलांवर ठेवत. धनुर्धाऱ्यांनी शत्रुवर बाणांचा वर्षाव सुरू केल्यावर शत्रुसैन्यात गोंधळ उडाला, की भालाईत घोडेस्वार व त्यांच्या पाठोपाठ पायदळ प्रसिक शत्रूवर प्रासांचा व शल्कांचा (डार्ट) मारा करीत करीत शत्रुला भीडत. जड भाल्यांनी तसेच तलवार, गदा व कुऱ्हाडींनी शत्रूची कत्तल करीत. शत्रू अंगाशी भीडल्यावर भाला वापरणे शक्य नसते. बंदुका आल्यानंतर बंदुकधाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भालेकरी लागत. बंदूकीला संगीन लावण्याची सोय झाल्यावर भालेकऱ्यांची गरज उरली नाही.

काटेयुक्त भाल्यांनी मासेमारी (हार्पून) करण्याची पद्धत पुरातन कालापासून चालत आली आहे. मैदानी खेळांच्या चढाओढींत प्रासक्षेप (जॅव्हेलिन थ्रो) ही चढाओढ असते. दुर्गादेवी व शंकर यांच्या हातात भालासदृश शक्ती, शूल व त्रिशूळ दिसतात. भाला व भालेकरी यांच्यावरून मराठीत काही म्हणी-वाक्यप्रचारही रूढ झालेले आहेत. (उदा. खांद्यावर भाला, जेवावयास घाला इत्यादी)

भाल्याचे शिक्षण घेण्यासाठी दंडाच्या टोकाला फाळाऐवजी कापडी चेंडू लावीत. अशा भाल्याला बोथाटी म्हणतात. सलाम, बंद, बेल, दुहेरी बेल असे काही भाल्याचे हात आहेत. शत्रुचा भाला उडविणे, अडविणे, हूल देऊन भाल्याचा वार करणे इ. युक्त्या शिकाव्या लागतात.

भाल्याच्या खेळात डुकराची शिकार (पिग् स्टिकिंग) हा शिकारीवजा खेळ १९४७ सालापूर्वी फार प्रिय होता. संस्थानिक, सैनिक व हौशी श्रीमंतांना हा शिकारवजा खेळ परवडत असे. जयपूर, कोल्हापूर इ. संस्थानांत हा खेळ प्रसिद्ध होता. मीरत या गावापाशी होणारी ‘खादीर चषक’ नावाची रानडुकराची शिकारी-स्पर्धा जगविख्यात होती.

संदर्भ: Pant, G. N. Studies in Indian Weapons and Warfare, New Delhi, 1970

भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई. प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई; मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे भाल्याला कमीअधिक महत्त्व मिळे. ग्रीक व मराठे यांना भाला अतिप्रिय वाटे. आर्यमित्र औदुंबर (इ. स. पू. दुसरे-पहिले शतक), अयोध्येचा आर्यमित्र, जेष्ठमित्र (इ. स. पू. पहिले शतक),…

Review Overview

User Rating !

Summary : मराठ्यांचे भाले : १. पायदळ भाला, २. प्रास, (हस्तिदंती मूठयुक्त), ३. प्रास (साधा), ४. संग किंवा सांग, ५. कंटकयुक्त भाला (बर्चा), ६. वक्रशीर्षयुक्त भाला, ७. शिखांचे गुरू गोविंदासिंग यांचा भाला.

User Rating: 4.68 ( 3 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.