स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला फक्त एक वर्ष जरी लढला तरी स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाला एक हयात पुरणार नाही. – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज.
हे किल्ले गुजरातच्या सरहद्दी जवळच्या साल्हेर किल्ल्यापासून ते सह्याद्री जेथवर खाली दक्षिणेपर्यंत पसरला आहे तेथवर विखुरले आहेत. प्रत्येक किल्ला कोणत्या ना कोणत्या मोक्याच्या घाटावर किंवा वाटेवर तोफा रोखून बसलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत १८० नवे किल्ले बांधले. बाकीचे जिंकून त्याची योग्य तशी दुरुस्ती केली.
हे किल्ले मराठ्यांच्या स्थापत्यकलेची व महाराजांच्या युद्ध नेतृत्वातील अजोड कौशल्याची साथ देणारे आहेत. कित्येक किल्ल्यांमध्ये शत्रूला तोंडघशी पाडणाऱ्या अशा खुणा वापरलेल्या आहेत कि पाश्चात्य लोकही चकित होतात. प्रतापगडाच्या एका फसव्या तटामागे दोनचारशे मावळे लपून राहतील अशी व्यवस्था आहे. शत्रू किल्ल्यात घुसलाच तर बालेकिल्ल्यावरील शिबंदी व फसव्या तटातले सैन्य चिमट्यात पकडून त्यांचा खातमा करण्याची तरकीब कोणत्याही बिगर मराठी किल्ल्यात नाही.
मुंबई-पुणे वाटेवर असलेला राजमाची किल्ला त्याच्या पश्चिमेला लोहगड यांचा चिमटा काय नि किती सांगावे.
रोज उठल्यावर तीनदा छत्रपतींचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना या किल्ल्यांची अजिबात कदर नाही. महाराष्ट्राची हि ऐतिहासिक भूषणे उन-पाऊस-वारा यांच्या माऱ्याने ढासळून कोसळून चालली आहेत.
जे किल्ले सोपे व अतिप्रसिद्ध आहेत त्यावर गडप्रेमी जेव्हा इतिहासाच्या व महाराजांच्या प्रेमाखातर जातात तेव्हा त्यांना “बेगड” प्रेमी लोकांनी करून ठेवलेले उत्पात बघायला मिळतात, या हरामखोर मंडळींनी कोरलेले घाणेरडी रंगरंगोटी पहिली तर कडेलोट किंवा शिरच्छेद या शिक्षा सौम्य वाटायला लागतात.
देशातल्या एकूण किल्ल्यांपैकी २५ टक्के किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्यांची निगा राखण्याचे काम जरी पुरातत्व खात्याचे असले तरी त्या खात्याकडून ते केले जाते कि नाही यावर सरकारने साधी देखरेख ठेवायला हवी होती पण त्या दृष्टीने काहीच केले जात नाही.
प्राचीन अवशेष, पुरातत्व शास्त्रीय स्थळे व अवशेष यांच्या रक्षणाविषयी १९५८ व १९६० चा असे दोन कायदे आहेत. त्यानुसार विध्वंस करणे, अवशेष हलवून नेणे, इमारती बांधणे, खोदकाम-खाणकाम करणे, सुरंग लावणे, झाडे तोडणे यांना मनाई आहे. पण..? हे नियम हि बंधने कोणासाठी, कशासाठी याचे भान ना सरकारला ना ही जणसामान्यांना. शायीस्तेखानाशी दोन महिने झुंजवणारा चाकणचा भुईकोट किल्ला आज सबंध विकला गेला, त्याच्या कमावलेल्या मातीच्या भरावावर औद्योगिक वसाहत उभी राहिली. पन्हाळ्याच्या पठारावर ऐश-ओ-आराम गृहे बांधण्याची स्पर्धा सुरु आहे. थोडीशी डागडुजी करून इतिहास जपता येत असताना देखील कुठे राजगडच्या पायऱ्या खचल्या, प्रतापगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांचे बुरुज ढासळले अशा खूप वाईट बातम्या आजकाल पेपर मध्ये ऐकावयास मिळतात. इतर किल्ल्यांचीही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहेच.
राजस्थान सरकारने पर्यटन विकासासाठी आर्थिक भरीव तरतूद करून ६ किल्ल्यांना अंतरराष्टीय स्मारकांचा दर्जा प्राप्त करून दिला. मध्यप्रदेश मधील बहुतांश किल्ल्यांचे सन २००५ पासून संपूर्ण संवर्धन केले जात आहे. गोवा राज्य असो वा कर्नाटक किंवा उत्तरप्रदेश, राजस्थान किंवा मध्यप्रदेश, तामिळनाडू असो वा आंध्रप्रदेश किंवा केरळ जर तेथील किल्ले जसेच्या तसे उभे केले जाऊ शकतात तर मग फक्त महाराष्ट्रातच एवढी दुरवस्था का म्हणून?
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संरक्षणासाठी व डागडुजीसाठी किती रक्कम मंजूर होत असतील असे वाटते? सरकारी दरबारी जर आकडे बघितले तर ते अतिशय हास्यस्पद आहेत. हि रक्कम २-४ लाख रुपये इतकीच आहे. काही किल्ल्यांचे तर पर्यटन कोंडीमध्ये रुपांतर करण्याचे काम चालू आहे, त्यासाठी मात्र सरकार कोटींच्या योजना आखत आहे. यात किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याची हमी किती हा एक वेगळाच प्रश्न आहे. पन्हाळ्यावर विविध ब्रान्डच्या बाटल्या गोळा करून विकण्याचा धंदा पर्यटनापेक्षा जोरात आहे एवढे सांगितले तरी पुरे आहे.
शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या सरकारला गडकिल्ल्यांसाठी काहीच करता येणार नाही का?Review Overview
User Rating !
Summary : ज्या गड-किल्ल्यांच्या सहाय्याने आणि पराक्रमी मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, त्याच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी आता तरी जागे व्हा, एकजूट व्हा !
I loved your article and would like work towards saving our history. Please contact me through my email I’d since I live in nederlands. But I would like to have your contact no. For some more information.
Thank you