पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र.
या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे.
हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही राजमुद्रा तसेच अखेरीस “मोर्तब” म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे.
या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते.
शिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे प्रतिवर्षी द्यावे आणि या खुर्दखताची एक नक्कल लिहून घेऊन हे अस्सल पत्र वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे सुपूर्द करावे.
कसबा गणपतीच्या देवळाची पिढीजात मालकी ठकार घराण्याकडे असून त्या घराण्याच्या कागदपत्रांमध्ये हे पत्र मिळाले आहे.
पत्र पुढीलप्रमाणे:
***** पत्राची पुढील बाजू: ******
प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। —– श्री मोरया
(अ)जरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे बजानी(ब)
कारकुनानी क॥ मावल देहाये प॥ पु(णे)
(ण) बिदानद सु॥ सबा अर्बैन अलफ (बद)
ळ दिप देवस्थान श्री—- कसबे पुणे
(ये)थे तेल दरोज वजन 66॥ अधसेर रास प्रमाणे
(झा) छ २१ सफूर पासुनु दर हरसाल देत जाणे ताज्या
खु॥ उजूर न करणे तालिक होऊनु असेली खु॥ वेद(मुर्ती)
विनायकभट ठकार त्या पासी फिराऊनु देणे मोर्तब
– मर्यादेयं विराजते
***** पत्राची मागिल बाजू : *****
कागद उलटा करून तारिख दिली आहे-
तेरिख २१___________माहे सफुर
सफर_______________सुरु सुद
रुजू सुरु
निवीस
टीप:
१. पत्रात इंग्रजी 66 सारखे दिसणारे चिन्ह ही संख्या नसून तत्कालिन आकडेमोडितील रिक्त स्थान दाखवण्याची ती पद्धत आहे.
२. क|| – हा कर्यात शब्दाचा संक्षेप आहे.
३. बदळ दीप देवस्थान – मोडीमध्ये बऱ्याचदा ल ऐवजी ळ हे अक्षर लिहिलेले असते, इथे बदळ च्या ऐवजी बदल वाचावे. बदल दीप देवस्थान म्हणजे देवस्थानच्या दिव्याकरिता.
४. रास – गुरे, पाळीव जनावरे यांची संख्या सांगताना त्या संख्येपुढे रास असा फार्शी शब्द लिहित.
५. इ|| – हा इस्तकबाल या शब्दाचा संक्षेप आहे.
६. छ – छ हा चंद्र शब्दाचा संक्षेप आहे.
७. खु|| – हा खुर्दखताचा संक्षेप आहे.
संदर्भ: शिवछ्त्रपतींची पत्रे खंड १ – डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी
Review Overview
User Rating!
Summary : पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेले दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस मोर्तब आहे.
chhan mahiti aahe, aankhi patre dyavit