प्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत. रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे. ही मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जातात. सर्व बाजूनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे, प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे, मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे आणि डाव्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत.
१. मुख्य शिवमंदिर:
मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे. स्तंभांवर भारवाहक यक्ष छत तोलून धरताना कोरलेले आहेत. २२०० वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली आलेली ही भारवाहक यक्षांची परंपरा पहावयास मिळते. ब्राह्मणी लेण्यांत आणि हिंदू मंदिरांत काही वेळा यक्षांची जागा यक्षिणी अथवा योगिनी घेताना दिसतात.
सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले कोरीव काम इतके आकर्षक नाही. मंदिराचे गर्भगृह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलिंग स्थापित केलेले आहे.
शिवमंदिरासमोरील देखणा नंदी आहे जो हुबेहूब भुलेश्वर नंदी प्रमाणे आहे. नंदिच्या पाठीवरील सुबक दोरखंड नक्षीकाम, साखळ्या, सापाचे वेसण, नक्षीदार पट्टे, छोट्या घंटांचे वेल अति सुंदर आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल असून, सभामंडप व गर्भगृहात भारवाहक यक्ष आहेत. मंदिराच्या बाजूस असलेलया ओसर्याु आहेत. बाहेरच्या भिंतीवर असलेल्या शिल्पांमध्ये. मंदिरांच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरलेली.
श्री विष्णूचे मत्स्यावतार, कूर्मावतार, वराह अवतार, नृसिंहावतार, वामन अवतार, परशुराम अवतार, रामावतार, कृष्णावतार, बुद्धावतार, कल्कीअवतार असे दहा अवतार येथे पाहावयास मिळतात.
मुख्य मंदिराच्या उजव्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे, डाव्या बाजूस राजा याच मंदिराचे दर्शन घेताना तर उजव्या बाजूस द्रौपदीस्वयंवराचे सुरेख शिल्प आहे. या व्यतिरिक्त बालकृष्णाचे गोकुळातले प्रसंग, कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला, अर्जुनाचे गर्वहरण, भीम गर्वहरण, अशोक वनातील हनुमान सीता दर्शन भेट. तसेच काही रोचक शिल्पे आहेत, इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा, टाळ, मृदंग आदी वाद्ये वाजवतांना केशसंभार करताना आणि वीणा वाजवताना कोरलेल्या आहेत.
२. विष्णू मंदिर:
उजव्या बाजूस असलेले विष्णू मंदिर आकाराने मुख्य मंदिरा पेक्षा लहान असून त्यावर प्रत्येक दिशेला देवतांच्या सुबक मुर्त्या आहेत. पश्चिम दिशेचा स्वामी वरूण, त्याचे वाहन हत्ती. वरूणाचा पाश आणि त्याची गदा सुद्धा यात कोरलेली आहे. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी त्याचे वाहन एडका आहे, दक्षिण दिशेचा स्वामी यम त्याचे वाहन रेडा आहे, नैऋत्य दिशेस स्वामी निऋती. हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो (हा बहुधा असूर होता) याचे प्रमुख शस्त्र खड्ग असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे. वायव्य दिशेचा स्वामी वायु हातात ध्वज घेऊन उभा आहे. त्याचे वाहन बहुधा बैल आहे. पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याच्या ऐरावत हत्तीसह उभा आहे. ईशान्य दिशेचा स्वामी ईशण अथवा रूद्र हाती त्रिशुळ, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे. उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे नक्रासह (मगर) यांसह उभा आहे.वरील दिक्पालांपैकी अग्नी, कुबेर आणि वरूणाच्या वाहनांमध्ये विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने दिली आहेत. अग्नीचे वाहन काही ठिकाणी बैल तर वरूणाचे नक्र अथवा मगर (वरूण जलदेवता असल्याने) असे दाखवलेले आहे.
याच विष्णू मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि मर्कटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहे. मर्कट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसावेत.
३. देवी मंदिर:
मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूचे देवी मंदिरावर स्त्री देवतांच्या मूर्ती आहेत.
चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे, वाराही, मातृकांमधली एक माहेश्वरी शस्त्रे त्रिशूळ, डमरू, खङग वाहन नंदी, हाती कमंडलू धारण केलेली कौमारी. एका हातावर बीजपूरक (म्हाळूंगाच्या फळांचा घोस ) धारण केले आहे जे नवनिर्माणाचे / पुन:निमिर्तीचे मांगल्याचे प्रतिक आहे. कमळावर बसलेली महालक्ष्मी, सिंह हे वाहन असलेली नारसिंही, हत्ती हे वाहन असलेली ऐन्द्री अथवा इन्द्राणी, गरूड वाहन असलेली वैष्णवी अशा वैविध्यपूर्ण सुबक मूर्ती आहेत.मंदिर कळस हत्ती आणि गुलाब पुष्पांच्या कला कुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.