पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजच्या मराठा इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. गिरीश मांडके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी आले होते. ‘शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी कागदपत्रे’ या विषयावर त्यांची भाषणे झाली. या प्रसंगी ‘मोडी’ लिपीतील संशोधनाच्या सद्यस्थितीविषयी त्यांची मुलाखत घेता आली. इतिहासकाळातील समाज, भाषा, लिपी अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले जातात. पीएच.डी.साठी सहज साध्य विषयांची निवड केली जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अपप्रवृत्ती बळावतात आणि इतिहास संशोधन राहून जाते, अशी परखड मते त्यांनी यावेळी मांडली. त्या सविस्तर मुलाखतीचा हा संपादित अंश.
१. प्राचीन ब्राह्मी लिपी मागे पडून अन्य लिपी कशा पुढे आल्या?
– ६ व्या ते ७ व्या शतकापर्यंत ब्राह्मी लिपी संबंध हिंदुस्थानात वापरात होती. अगदी बदामीच्या चालुक्यांपर्यंतचे ताम्रपट ब्राह्मी लिपीत मिळतात. याच काळापासून राष्ट्रकूटांचे ताम्रपट देवनागरी लिपीत यायला लागलेले दिसून येतात. त्यात दंतिदुर्गाचा ताम्रपट डेक्कन कॉलेजमध्ये आहे. भाषा प्राकृत असली तरी लिहिण्याची लिपी ब्राह्मी आणि देवनागरी होती. पुढील काळात ब्राह्मी मागे पडत गेली आणि देवनागरीचा प्रसार झाला. त्यानंतर यादव काळात वेगाने लिहिण्यासाठी मोडी लिपीचा शोध लागला. तीच पुढे व्यवहाराची लिपी बनली.
२. ‘मोडी’चा उदय कसा झाला? गुजरातच्या कच्छ क्षेत्रातील ‘मोड वणिक’ या व्यापारी लोकांची लिपी मोडी, हे खरे आहे काय?
– नाही, तसे म्हणता येत नाही. मोड वणिक किंवा मारवाडी व्यापा-यांच्या लिपीचे मोडीशी साधर्म्य असले तरी देवनागरी वेगाने लिहिण्यासाठी पर्यायी लिपी आवश्यक होती. उत्तर हिंदुस्थानात इस्लामच्या प्रभावकाळात फारसीचा वापर वाढला. तिची लिपी ‘शिकस्तन’ म्हणजे तोडून लिहिण्याची लिपी. दक्षिणेत या काळात यादवांचा प्रधान हेमाद्रीपंताच्या काळात ‘बाळबोध’ला मोडून लिहिण्याचा प्रघात सुरू झाला. वेगाने देवनागरी अक्षरे मोडून लिहिली जाऊ लागली. तीच मोडी लिपी.
३. ‘मोडी’चा उपयोग कसा आणि कुठे केला गेला?
– मोडीचा सर्वाधिक उपयोग व्यापा-यांनी केला. चोपडी, व्यापारविषयक हिशेब आणि जमा खर्च लिहिण्यासाठी ही लिपी सर्रास वापरली गेली. त्याचबरोबर ही पत्रव्यवहाराची लिपी बनली. व्यापारी आणि सामान्यजनांच्या रोजच्या व्यवहारात मोडी लिपी लोकप्रिय झाल्याचे आज त्या लिपीत मुबलक उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांवरून लक्षात येते. आज महाराष्ट्रात कोट्यवधी ऐतिहासिक आणि पेशवेकालीन पत्रव्यवहार आणि कागदपत्रे बहुतांशी याच लिपीत आढळतात.
४. मोडी लिपीच्या अभ्यासातून काय लक्षात येते? इतिहासाच्या अभ्यासकाने ही लिपी का अभ्यासावी?
– मोडीच्या अभ्यासातून इतिहास काळातील राजकीय आणि सामाजिक इतिहासाबरोबरच भाषाशास्त्रीय विचार मिळतो. मोडी लिपीबद्ध कागदपत्रांतून तत्कालीन समाजाचे अनेक बंध उलगडतात. महसूल, खगोल, भूगोल, व्यापार, शेती, कौटुंबिक, राजकीय संबंध यांच्यावर प्रकाश पडतो. थोडक्यात महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे तर इतिहासाच्या अभ्यासाची दारे या लिपीच्या अभ्यासानेच उघडतात. १८ व्या शतकात अनेक अहवाल या लिपीत लिहिले गेले. त्यात वनांसंबंधी काही उल्लेख आले आहेत. महाराष्ट्रातील वनक्षेत्रात आज जवळजवळ नामशेष झालेल्या कित्येक वनस्पतींचे उल्लेख त्यात आढळले आहेत. जनवादी इतिहासाच्या अभ्यासासाठी तर मोडी कागदपत्रांसारखा खजिना दुसरा नाही.
५. मराठ्यांच्या इतिहासाचा प्रमुख स्रोत समजली जाणारी कोट्यवधी कागदपत्रे या लिपीत आहेत. तरीही मोडीच्या अभ्यासाकडे अभ्यासक पाठ फिरवतात. हे खरे आहे काय?
– होय. आज इतिहासाच्या बहुतांश अभ्यासकांना मोडी येत नाही. त्यामुळे संशोधकांचा हात न लागलेली लक्षावधी कागदपत्रे आज महाराष्ट्रभर पसरलेली आहेत. ती पाहण्यासाठी, वाचण्यासाठी कुणी समोर येत नाही. मेहनत घेण्याची फारशी इच्छा नाही, ही शोकांतिकाच आहे. अनेक विद्यापीठांनी या लिपीतील शिक्षणासाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पण या मोडी वर्गांना तुरळक उपस्थिती असते. इतिहासाच्या अभ्यासकांना मोडी लिहिता-वाचता आली तर इतिहासातील अनेक पेच सुटू शकतील.
६. अभ्यासक, संशोधकांना मोडी न येण्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे, असे तुम्हाला वाटते का?
– प्रामुख्याने मराठ्यांच्या इतिहासाची बहुतांश साधने मोडी लिपीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सगळेच घेतात. मात्र त्यांच्या इतिहासाचे संशोधन करण्याची वेळ आली की, मेहनतीपासून पळ काढतात. संशोधनासाठी जो अभ्यास, श्रम करावे लागतात. ते कुणी करत नाहीत. त्या काळातील समाज, भाषा, लिपी अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले जातात. पीएच.डी.साठी सहज साध्य विषयांची निवड केली जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अपप्रवृत्ती बळावतात आणि इतिहास संशोधन राहून जाते. संशोधकांना मोडी न येण्याने सर्वाधिक नुकसान मराठ्यांच्या इतिहासाचे झाले आहे.
७. इतिहास संशोधनातील अपप्रवृत्तींवर थोडा अधिक प्रकाश टाकाल काय?
– मोडी शिकण्यापासून पळ काढल्यामुळे संशोधक दुय्यम साधनांवर अवलंबून राहू लागतो. इतिहासाचे सर्व विषय मग मूळ साधनांकडे न जाता दुय्यम आणि तिय्यम साधनांच्या आधाराने अभ्यासले जातात. त्यामुळे संशोधनाचा दर्जा तर खालावतोच पण त्याचबरोबर संशोधन आपली वस्तुनिष्ठता गमावते. मोडीपासून पळ काढलेले संशोधक आधुनिक इतिहासाचा अभ्यास करतात. पण मग तोही नीट होत नाही आणि यातून ‘कॉपी-पेस्ट’ संस्कृतीचा उदय होतो. मोडी, ब्राह्मी, देवनागरी लिपी बरोबरच संस्कृत, फारसी, पाली, उर्दू या भाषासुद्धा संशोधकांना नीट येत नाहीत. यामुळे संशोधनात साचलेपण आले आहे.
प्रा. गिरीश मांडके
इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक
डेक्कन कोलेज, पुणे
शब्दांकन: संकेत कुलकर्णी
Review Overview
User Rating!
Summary : आज इतिहासाच्या बहुतांश अभ्यासकांना मोडी येत नाही. त्यामुळे संशोधकांचा हात न लागलेली लक्षावधी कागदपत्रे आज महाराष्ट्रभर पसरलेली आहेत. ती पाहण्यासाठी, वाचण्यासाठी कुणी समोर येत नाही. मेहनत घेण्याची फारशी इच्छा नाही, ही शोकांतिकाच आहे. अनेक विद्यापीठांनी या लिपीतील शिक्षणासाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पण या मोडी वर्गांना तुरळक उपस्थिती असते. इतिहासाच्या अभ्यासकांना मोडी लिहिता-वाचता आली तर इतिहासातील अनेक पेच सुटू शकतील.
I have some documents of 1500 / 1600 years in modi . I could like to translate and also learn modi .pl revert
modi lipi cha abhas karun itihasache yogye sansodhan karave kontehi vad honar nahit. Sataya samor yeiel.
नमस्कार
मी पुणे शहरात रहातो मी ऐतिहासिक दस्तऐवज वर वाचण करतोय पण मोडी लीपी येत नसल्याने वाचणामध्ये अडथळे येत आहेत तरी कृपया मोडी शिकण्यासाठी मला मार्गदर्शन करावे पुणे शहरातील क्लासेस ची माहीती द्यावी ही विनंती
नमस्कार विवेक, पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात (भरत नाट्य मंदिर शेजारी) माफक शुल्कात मोडी शिकवली जाते.
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
तुम्हीच मोडी शिका हे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक देखील घेऊ शकता.
दिनांक ३ ते १५ मे कालावधीत सिमा तरस (९९२११७६६१७) यांचे नवी सांगवी येथे मोडी प्रशिक्षण वर्ग सुरु होत आहेत.
शिवाय आपल्या ह्या वेबसाईटवर देखील मोडी शिका या सदरा खाली प्राथमिक मोडी शिकता येऊ शकते.
Thnk u sir for recommendation…
Seema Taras.