Home » महाराष्ट्रातील किल्ले » आज्ञापत्रांतील दुर्ग प्रकरण
गडकोटांचे महत्व
गडकोटांचे महत्व - राजगड सुवेळा माची

आज्ञापत्रांतील दुर्ग प्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले.
हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशानवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखीं महासंस्थानें आक्रमिलीं, संपूर्ण तिस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यांशी अति श्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होतें? परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षां राज्य संरक्षण करणें आहे, त्यापेक्षां अधिकोत्तर साधनी स्वतां गड किल्ल्याची उपेक्षा न करितां परम सावधपणें असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. नूतन देश साधणें. त्या देशांत जीं स्थळें असतील ती महत्प्रयासाने हस्तवश करावीं ज्या देशात गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीनें नूतन स्थळें बांधीत बांधीत तो देश आक्रमावा.

त्या स्थळांचे आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासनें वश करावा. असें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलुखीं टिकाव धरून रहावत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेंच नाहीं. इतक्याचें कारण, गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणाजे अभ्रपटलन्याय आहे. याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्यांचे संरक्षण करणें, व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानूं नये.

गडाची रचना व बांधणी

राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशीं स्थळें पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी आसूं नये. कदाचित असला तरी सुरूंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरूंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा.
गडाची इमारत गरजेची करूं नये. तट, बुरूज, चिलखतें, पाहारे, पडकोट जेथें जेथें असावे ते बरे मजबूत बांधावे, नाजूक जागे जे असतील ते सुरूंगादि प्रयत्नेंकरून, अवघड करून, पक्की इमारत बांधोन गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढें बुरुज देऊन, येतिजाती मार्ग बुरूजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिंता गड पाहून, एक दोन तिन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्यें हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या. इमारतीवरील मामलेदार वगैरे आदिकरून ठेवाणें ते बरे शहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेवावे. गडाची इमारत मुस्तेद करावी. कित्येक किल्ले प्रत्तेक पर्वताचे आहेत.

कित्येक पर्वत थोर थोर, त्याचा एखादा कोन, कोप-याची जागा पाहोन बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढें अथवा तटाखालीं मैदानभुमी लागते, म्हणजे तो गड भुईकोटांत दाखल जाहला. आला गनीम त्यानी दरवाजास अथवा तटास लागावें असेम होतें ही गोष्ट बरी नव्हे. याकरितां जातीचा किल्ला असेल त्यास आधीं सर्व प्रयत्ने दरवाज्यापुढें तटाखाली जितकें मैदान असेल तितका खंदक खोल आणी रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधोन त्यावर भांडी, जुंबरे ठेवून, खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे असें करावें. गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून, तावर झादी वाढवून आणखीकडे परके फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे. याविरहित बलकबुलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालूं देऊं नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाज्याचा राबता करुन सांजवादा चढवीत जावा.

गडाची राखण

गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें एक काठीही तोडों न द्यावी. बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावया कारणाजोगे असों द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची घस्ती करीत जावी. घस्तीचा जाब मेटेकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतीचें घर किंवा घराभोंवतें दगडाचें कुसूं सर्वथा असो न द्यावें. तसेंच गडावर आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी तें स्थळ तों आवश्यक बांधणे प्राप्त झालें तरी आधी खडक फोडून तळीं, टांकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशीं मजबूत बांधावीं. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें. गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचें घर बांधो नये.

राजमंदिरासही भिंती इटांच्या बांधून त्यास चुना दाट गच्च घालावा. घरांत कोठें उंदिर, विंचू, किडा , मुंगी राहील अशी दरद न ठेवावी. घरास कुसूं पाहीजे तें निरगुंडी आदिकरून झाडांचें पातळ घालावें. गडकरी यांणी राजमंदिर म्हणून खाली न ठेवावें. सर्व काळ करून धुरे करुन घर शाबूत राही, जीव जंतु न राही तें करावें. धनी गडावरी येतात असें कळतांच आगोदर दोन चार दिवस मामलेदारानें येऊन, खासा उभा राहून, संपुर्ण घर सारवून, रांगोळी आदिकरून घालून धनी गडावरी येईतोपर्येत त्याच जागा सदर करून बसत जावें. गडावरील मार्गा मार्गावरील बाजारांत तटोतट केर कसपट किमपी पडो न द्यावें. ताकीद करून झाला केर गडाखाली न टाकतां जागाजागी जाळून ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावें.

गडावरील साहित्य व युद्धाची सामुग्री

गडावरील धान्यगृहें, इस्तादेचीं घरें, ही सकळही (आहेत त्यास) अग्नी, उंदिर, किडा, मुंगी वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी करून गच्ची बांधावी. ज्या किल्ल्यास काळा खडक दरजेविरहीत असेल तसे ठिकाणी ते कड्यास टांकी करावी. स्वल्पमात्र दरज असेल तरी गच्च लावून पाझर न फुटे असें करावें. गच्चंस अरेना अशी भुई असेल तेथें गच्चीघरें करून थोर थोर कांचेचे मर्तबान, झोलमाठ, मडकी आणून त्यांस मजबूत बैसका करून त्यांत तेल तूप सांठवावें. दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. सदरेपासून सुमारांस जागा बांधून भोंवते निरगुंडी आदिकरून झाडांचें दाट कुसूं घालून बांधावें. तयास तळघर करावें. तळघरांत गच्च करावा. त्यांत माच घालून त्यावर दारूचे बस्ते, मडकी ठेवावे. बाण, होके, आदिकरून मध्यघरांत ठेवावे. सर्दी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत. तट सरनोबत, बारगीर, सदर-सरनोबत, हवालदार यांसी बंदुकीचा व भांडी डागायचा अभ्यास असावा. (संपुर्ण हशमांनी तलवार, टाकणी हेही हत्यारें बाळगीत जावी.)

गड पाहून, गडाचे नाजूक जागे पाहून, त्या त्या जागी व गडाचे उपराचे जागां त्या त्या सारिखी भांडी, जुंबरे, चरक्या आदिकरून यंत्रे बुरुजाबुरूजांत तटोतट टप्पेगुजरे बांधून ठेवावी. भांडीयांचे गाडे, चरक, भांडी पाहून मजबूत लोखंडी कट देऊन त्यावर ठेवावीं. दारूच्या खलित्या, गज, भांडी निवावयाच्या कुंच्या, गोळे, कीट आदीकरून रेजगिरी सुपरी प्रमाणे लहानथोर नदीतले खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या, तरफा, काने, दुरूस्त करावयाचे सामते, आदिकरून हा जिन्नस भांडियांचा भांड्याजवळ हमेशा तयार असावा. अहिनी दगडी जिन्नस दारूचे अंतरी ठेवावे. होके, बाण हेही पहारेपहा-यास तयार असों द्यावे. दरम्यान, मुलखांत गनीम कोठें आहे, येईल ते समयीं कोठीतून आणून तयार करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूळ, आळशी. तशास मामला सांगों नये. एक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें, तरीच समयीं दगा होत नाहीं, लावून दिला कायदा अव्याहत चालतो. पर्जन्यकाळी भांडीयास व दरवाज्यास तेल मेणे देऊन भांडियांचेही कोने मेणानें भरून भांडियांवर भांडियापुरती आघाडी घालून जायां होऊं न द्यावीं. वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे. इमारतीचे काम आधीं तयार झालेंच असतें. तथापि तट, पहारे, बुरूज, कोट, काहिं जायां होतच आहे ते वरचेवरी मजबूत करावे लागतात. तटास झाड वाढतें तें वरचेवरी कापून काढावें. तटाचें व तटाखालील गवत जाळून गड नाहाणावा लागतो.

गडाचा कारखाना

या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमी ठेवून मुद्राधारी यांचे स्वाधीन करावा. तसेंच गोलंदाज विश्वासूक कबिलेदार, नेमिला जागा दुरूस्त मारणार, असे मर्दान, गड व गाडाचीं भांडी पाहून जितके लागत असतील तितके ठेवावे. गडावरी झाडें जीं असतील ती राखावीं. याविरहित जीं जीं झाडे आहेत तीं फणस, चिंच, वड, पिंपळ, आदिकरून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे, आदि करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जें झाड होत असेल तें गडांवर लावावें, जतन करावें. समयी तितकेही लांकडाचे तरी प्रयोजनास येतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक, व्युत्पन्न तसेंच रसायण वैद्य व झाडपाल्याचे वैद्य व शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, व लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवावे. लहानसहान गडांवर या लोकांचे नित्य काम पडतें असें नाही, याकरिता त्यांचे कामाची हत्यारें त्यांजवळी तयार असों द्यावीं. जे समयीं काम पडेल ते समयी काम करितील, नाहीं ते समयी आदिकरून तहशील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावे. गडोगडीं तनखा, दास्ताद, इस्तान आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करून ठेवावेंच लागतें. याविरहित गड म्हणाजे आपले कार्याचे नव्हेत, असें बरें समजून आधीं लिहिलेप्रमाणें उस्तवारी गडाची करावी.

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशानवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखीं महासंस्थानें आक्रमिलीं, संपूर्ण तिस-बत्तीस वर्षेपर्यंत या…

Review Overview

User Rating !

Summary : संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले.

User Rating: 4.77 ( 3 votes)

4 comments

  1. संपूर्ण आज्ञा पत्र कुठे मिळू शकते, आम्ही नव्याने सुरू करत असलेल्या व्यापारी प्रतिष्ठाना च्या दर्शनीय भागात महाराजांन च्या आज्ञा लावायच्या आहेत

    • लिप्यांतरित आज्ञापत्रे बुकगंगा, रसिक साहित्य वर ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसेच अप्पा बळवंत चौकात देखील मिळेल

  2. आज्ञापत्र मुळातून वाचण्याचा आनंद काही औरच आहे. त्याबद्दल साहित्य आणि शिवप्रेमी वाचकांतर्फे आभार

  3. अमित प्र. मुसळे

    खुपच छान, सविस्तर माहीती…

Leave a Reply to अमित प्र. मुसळे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र

शिवरायांचे आज्ञापत्र

छायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग

कसबा गणपती शिवरायांचे आज्ञापत्र - Kasba Ganpati Shivray Aandyapatra

छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र

पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख ...