Review Overview
User Rating !
Summary : स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.
महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य
महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे मराठे सरदार या साम्राज्याचे संरक्षण व विस्तार करण्याच्या कामी लष्करी मदत करण्याच्या करारावर अलीकडील ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीप्रमाणे आपापल्या प्रांतांत संपूर्ण स्वराज्याचे हक्क चालवीत होते.
महाराष्ट्रियांनी जे साम्राज्य स्थापिले त्याला एक प्रकारचे निश्चित धोरण होते त्याची फोड, ठोकळमानानें पुढीलप्रमाणे करता येईलः
१६४० सालपर्यंत मराठयांचं धोरण मुसुलमानी अंमलाखाली मानमरातब मिळवून व जहागिरी उपभोगून थोडेसे स्वतंत्रपणे वागावयाचे होते. शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रापुरते लहानसेच पण पूर्ण स्वतंत्र असे स्वराज्य स्थापावयाचे व आणीक मिळविण्याचा प्रयत्न करावयाचा असा त्या धोरणांत फरक झाला. शिवाजी महाराज्यांच्याच्या पश्चात् शाहूराजे सुटून येईपर्यंत स्थापलेल्या राज्याचे औरंगझेबापासून हर प्रयत्नाने मराठयांनीं रक्षण केलें. शाहूपासून सवाई माधवरावापर्यंत, हें जुनें स्वराज्य सांभाळून, सर्व हिंदुस्थानावर आपली सत्ता स्थापण्याची व दिल्लीची मोंगल पातशाही नांवाला राखून प्रत्यक्ष व्यवहारांत आपली हिंदुपदपातशाही गाजवावयाची असे हे धोरण बळावले (आणि महाराष्ट्रीय साम्राज्याचा महत्त्वाचा काळ काय तो हाच आहे). पुढे रावबाजीपसून मराठयांचे साम्राज्यविस्ताराचे धोरण पुन्हां संकोचित होऊन, इंग्रजांपासून स्वराज्याचे संरक्षण करावयाचे व साधल्यास पुनरपि स्वातंत्र्य मिळवावयाचे हा प्रयत्न सुरू होता. १८१८ सालीं मराठी साम्राज्य अनेक कारणांनी लयास गेले. तेव्हांपासून आजतागायत हयात असलेल्या मराठी संस्थानिकांचे धोरण आरंभी सांगीतलेल्या स. १६४० पूर्वीच्या मराठयांच्या धोरणावर येऊन बसले आहे.
शिवाजी महाराजांचे साम्राज्य
शिवाजी महाराजांनी स्थापण्यास आरंभ केलेल्या राज्याचे मूळ म्हणजे पुणे, सुपे, इंदापूर, ही त्याची लहानशी जहागीर होय. या प्रदेशाचे ठोकळ क्षेत्रफळ २३०० चौरस मैल आहे. तीस वर्षांत त्याच्या राज्याचा विस्तार कल्याण ते गोवे, भीमा ते वारणा यांमधील १५००० चौरस मैलांवर पसरला, आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी तर पुढील प्रांताचा समावेश मराठी राज्यांत झाला होता, मावळ, वाई, सातारा, पन्हाळा, दक्षिणकोकण, बागलाण, त्र्यंबक, धारवाड, बिदनूर, कोलार, श्रीरंगपट्टण, कर्नाटक, वेलोर व तंजावर या देशांतील मिळून एकंदर २६७ किल्ले. राज्याची ठोकळ चतुःसीमा पूर्वेस भीमा; पश्चिमेस अरबी समुद्र; उत्तरेस गोदावरी; व दक्षिणेस कावेरी होय. या एकंदर प्रदेशाचे क्षेत्रफळ साधारणपणे १२०००० चौरस मैल येईल व उत्पन्न दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचे होते.
नंतरचे साम्राज्य
शिवाजी महाराजांच्या प्रश्चात् मराठी राज्य दक्षिणेकडे फारसे वाढले नाही, उलट हैदर, टिप्पू, इंग्रज हे प्रबळ झाल्यावर थोडे फार कमीच झाले. त्यावेळी साम्राज्यविस्ताराचा भर उत्तरेस व पूर्वेकडे होता. उत्तरेस राजपुताना धरून पंजाबपर्यंत, व पूर्वेस बंगालपर्यंत असा (साडेपाच लक्ष चौरस मैल) हा विस्तार होता. त्यावेळी उत्तर हिंदुस्थानांत एकंदर १५ सुभे असून त्यांचा वसूल ३२ कोटी, ४६ लक्ष होता; दक्षिणेत ६ सुभे असून सर्व हिंदुस्थानच्या या २१ सुभ्यांचा वसूल ५० कोटी, ७३ लक्ष होता. त्यांत मराठी साम्राज्याचा वांटा १२ कोटी ४२ लक्ष २० हजारांचा होता. हे आंकडे इ.स. १८०३ च्या वेळचे आहेत. सारांश, शिवाजी महाराजांच्या जहागिरीचे रूपांतर होऊन जे मराठी साम्राज्य वाढले ते त्याच्या मूळच्या जहागिरीच्या २३९ पट वाढले व उत्पन्न ५४ हजार पटीने वाढले.
साम्राज्य विस्ताराचे प्रकार
मराठी साम्राज्याचा विस्तार जो झाला तो निरनिराळया रीतींनी झाला
(१) स्वराज्य
(२) जहागिरी व वसाहती
(३) चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याच्या हक्काचा मुलूख
(४) केवळ खंडणी वसूल करण्याचा म्हणजे मांडलिक राजांचा मुलूख
(५) घांसदाणा मिळविण्याचा मुलूख व
(६) मुलूखगिरीचा मुलूख
स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.
विस्तार कसा होत गेला
विस्तार केव्हां व कसा झाला याची साग्र माहिती येथे देता येत नसल्याने ठोकळ मानाने सांगतो. शिवाजीच्या मृत्यूच्या वेळीं राज्याचा विस्तार किती होता तो वर दिलाच आहे. संभाजी, राजाराम व दुसरा शिवाजी यांच्या कारकीर्दीत औरंगझेबाच्या स्वाऱ्यांमुळें या राज्याचा कांही काळ बराच संकोच झाला; मात्र कायमचा झाला नाही. कारण औरंगझेबाने मराठी मुलूख एकदां जिंकून पुढील प्रांत घेण्यास चाल केली की, मराठयांनीं पुन्हां आपला गेलेला प्रांत परत जिंकून घ्यावा; तरीपण बराचसा कर्नाटकाचा भाग मोंगलांनी कायमचा घेतला (१६८०-१७०७). त्यामुळे मराठी राज्याच्या वसुलाला बरीच खोट बसली (कारण कर्नाटकप्रांत पुष्कळ श्रीमंत असे). तसेच कुतुबशाही व आदिलशाही मोंगलांनी बुडविल्याने तिकडून येणाऱ्या खंडण्यांसहि मराठयांस मुकावे लागले. या सुमारास निझामाने महाराष्ट्रांत आपले ठाणे देऊन एव्हांपासून पेशवाईअखेरपर्यंत संधि सापडली म्हणजे मराठी राज्याचे लचके तोडण्याचे काम चालू ठेविले. शाहु गादीवर आल्यावर प्रथम बाळाजी विश्वनाथाने चौथे-सरदेशमुखी व स्वराज्याच्या सनदा आणिल्या, आणि मग बाजीरावानें सय्यदबंधूंच्या भानगडीचा फायदा घेऊन माळवा, गुजराय, बुंदेलखंड, वऱ्हाड या प्रांतांत हातपाय पसरले. थोडयाच काळांत हे प्रांत व राजपुतान्यांतील कांही मुलूख मराठी राज्यांत पूर्णपणे सामील झाला. हिंदुपदपातशाहीच्या चढाईच्या धोरणास बाजीरावानें सुरवात केली. बरेचसे रजपूत राजे मराठयांचे मित्र व कांही मांडलिकहि बनले आणि शाहू गादीवर येण्यापूर्वी मराठी राज्याचा जो विस्तार होता, त्याच्या दुप्पट विस्तार बाजीरावाच्या मृत्यूच्या वेळी झाला. नानासाहेब पेशव्यांनी कांही दिवस उत्तरेकडे लक्ष घालून अंतर्वेदि, पंजाब, ओरिसा, संयुक्तप्रांत या प्रदेशांतील बराचसा मुलूख हाताखाली घातला. या वेळीं तर दिल्लीच्या बादशहाने स्वतःसाठीं कांही नेमणूक ठरवून पेशव्यांस आपल्या रक्षणाचें व राज्यकारभार करण्याचें काम सांगितले आणि ते काम शिंदे, होळकर यांनी पेशव्यांतर्फे पार पाडले. दिल्लीची मोंगल पातशाही पुण्याच्या हिंदुपातशाहीच्या पंखाखाली प्रथम जी गेली ती याच सुमारास. उत्तरेकडे याप्रमाणें अंमल बसल्यावर नानासाहेबांनीं दक्षिणेकडे लक्ष घालून कर्नाटक मिळविण्याचा उद्योग केला आणि ‘उत्तरेकडील व दक्षिणेकडील सुवर्णनद्यांचा संगम मध्यें पुण्यास केला.’ कर्नाटकचे नबाब, निझाम, फ्रेंच, इंग्रज यांच्या भांडणाचा फायदा घेऊन नानासाहेबांनी कर्नाटकांतील शिवरायांनी मिळविलेल्या प्रांतापैकी जवळ जवळ १/४ प्रांत परत घेतला. निझामाकडूनहि उदगीरच्या लढाईंत खानदेश, नगर व विजापूर वगैरे जिल्ह्यांतील ६२॥ लक्षांचा मुलूख घेतला; इतक्यांत पानिपत होऊन उत्तरेकडील मराठयाच्या अंमलास धक्का बसला, परंतु थोरल्या माधवरावानी २३ वर्षांच्या अवधींत पुन्हा आपला गेलेला प्रांत परत मिळविला आणि पुनरपि दिल्लीच्या बादशहास आपल्या लगामीं लाविले. यानंतर सवाई माधवरावाच्या वेळीं शिंदे, होळकर, भोंसले या उत्तरेंतील सरदारांनीं दिल्लीच ताब्यांत घेऊन, नानासाहेबांच्या वेळचा तिकडील सर्व प्रांत हस्तगत केला आणि दक्षिणेंतही कर्नाटक मोकळे करून निझामाकडून खडर्याच्या लढाईत ४० लक्षांचा मुलूख घेऊन बहुतेक निझामाचे राज्य खालसा केले माधवरावाच्या कारकीर्दीत सर्व मराठी साम्राज्याचा वसूल २० कोटीपर्यंत असावा व विस्तार प्रत्यक्षाप्रत्यक्ष सर्व हिंदुस्थानच्या ३/४ भागावर असावा. रावबाजीच्या वेळच्या वसूलाचा आकडा मागे दिलाच आहे.
साम्राज्याचा कारभार
शाहूंच्यापर्यंत छत्रपती स्वतः राज्यकारभार पहात असत. त्याच्या मदतीला अष्टप्रधान ही संस्था असे. ती साधारणपणे सांप्रतच्या इंग्लंडच्या कॅबिनेटच्या पद्धतीची असे. ही एक प्रकारची एकमुखी (राजाच्या हुकमतीखालची) राजशासनपद्धति होती. प्रजेला त्यात फारशी भागीदारी नसे. सामाजिक बाबतींत ग्रामपंचायती सर्रहा अमलांत असल्यानें राजा तींत हात घालीत नसे. प्रजेच्या राजकीय हक्काची कल्पना व सांप्रत आपण पहातों तशी तिला अनुसरून केलेली योजना १७ व्या शतकांत यूरोपमध्येंहि अंमलांत नव्हती. मात्र एकोणिसाव्या शतकांत तिकडे ती अमलांत आली असता हिंदुस्थानांत (अर्थात मराठी साम्राज्यांत) तिची कोणीहि ओळख करून घेतली नाही. मराठी साम्राज्यांत परदरबारचे प्रांत जिंकून तेथे जे मराठी सरदार रहात असत, ते छत्रपती (अथवा पेशवे) चे नोकर अथवा मांडलिक म्हणून असून त्यांना जबाबदार असत; परराज्याशीं तह अथवा लढाई करण्याचें स्वतंत्र अखत्यार त्यांस नसत. दत्तकाची परवानगी हि या मध्यवर्तीसरकारकडून घ्यावी लागे; हा नियम मराठी साम्राज्याचे राजपुतान्यांतील, बुंदेलखंडांतील, कर्नाटकांतील व इतर प्रांतांतील जे मांडलीक राजे होते त्यांनाही लागू होता. परकीय शत्रूपासून संरक्षणाच जबाबदारी साम्राज्यास घ्यावी लागे व त्याबद्दल त्यांच्याकडून खंडणी मिळे. त्यांना साम्राज्य सांगेल तितकी फौज साम्राज्यसेवेसाठीं ठेवावी लागे. शिंदे, होळकर, भोंसले वगैरे या साम्राज्याचे सरदार म्हणजे आजचे गव्हर्नर, यांना आपल्या जहागिरीचे हिशेब मध्यवर्तीसरकारांस द्यावे लागत. शाहूंनी मृत्यूसमयी आपल्याच हाताने नानासाहेब पेशव्यांस साम्राज्याची कुलअखत्यारी दिल्यापासून पुण्यास मध्यवर्ती सरकारची गादी स्थापन झाली. प्रथम हे सरदार पेशव्यांनां हा मान देण्याचा नाखूष असत, परंतु पेशव्यांनी सर्व साम्राज्याची सत्ता एकमुखी करून आपल्या हाती आणली. या सरदारांना आपल्या प्रांताच्या वसुलापैकी कांही ठराविक रक्कम साम्राज्यसरकारांत भरावी लागे. यांना ठराविक लष्कर ठेवण्याबद्दल सरंजाम तोडून दिलेले असत. यांच्याशिवाय लहान लहान जहागीरदार, इनामदार लोक असत, त्यांना लष्करी नोकरी माफ असे. मात्र वेळप्रसंगी वसुलांत १/४ १/४ (पाव भाग) असा पैका सरकारांत भरावा लागे.
लष्कर व आरमार
लष्कराला (घोडदळ, पायदळ, तोफखाना) पगार काय असे त्याची एकंदर व्यवस्था कशी असे हे पहावयाचें असल्यास खऱ्याचे ऐ. ले. सं. चे भाग पहावेत. खडर्याच्या लढाईंत मराठी साम्राज्याचें लष्कर सर्वांत जास्त होते (१ लाख, १३ हजार) आणि पानपतच्या वेळी ७० हजार होते. इ.स. १८०० च्या सुमारास साम्राज्याचे लष्कर २,७४,००० होते. सरदार, सरंजामदार, इनामदार यांचा लष्कराच्या बाबतीत साम्राज्याशी कसा संबंध असे, ते वर सांगितलेच आहे. आरमाराचे महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखून त्याचा उपयोग करून घेतला. पेशव्यांनींहि तेंच धोरण पुढे चालविले. थोडया फार फरकाने पेशवाईअखेरपर्यंत कोंकणकिनाऱ्यावर मराठी साम्राज्याचे वर्चस्व होते. अखरीच्या सुमारास इंग्रजांनी अंमल बसवियास सुरवात केली. कान्होजी आंग्रेयांना तर इंग्रज, फिरंगी हे चळवळा कापत असत. नानासाहेब पेशव्यांनीं एक चूक करून आंग्रेंना हतप्रभ केले व इंग्रजांना कोंकणांत हात घालावयास सवड दिली. पण नानसाहेबांच्या या चुकीस एक कारण होते, नानासाहेब हा मराठी साम्राज्याचा मुख्य अधिकारी होता, अर्थांत त्याच्या अनुरोधाने सर्व सुभेदार, सरदार, अंमलदार यांनीं चालावयास पाहिजे होते. परंतु ते कांहीं चालत नसत. त्यांत कान्होजीही एक होते. ते नानासाहेबांच्या आखलेल्या आरमारी योजनांच्या धोरणास विरोध करी, म्हणून त्याच्या हातून आरमारी सत्ता काढून घेणे श्रीमंतांस भाग होते. त्याप्रमाणे ती हाती आल्यावर पेशव्यांनी आरमाराचा सुभा धुळपास देऊन ती एक बाब कह्यांत ठेवली. हैदरटिप्पूवरील व शिद्दी-पोर्तुगज यांच्यावरील स्वाऱ्यांत पुढे या आरमाराचा साम्राज्याला फार उपयोग झाला. या आरमारांत ४०० टनपर्यंतची लढाऊ जहाजे असत आणि त्यांवर ५ पासून ५० पर्यंत तोफा असत. एका विजयदुर्गच्या आरमारी सुभ्यांतच ३ हजारापर्यंत नाविक दळ होते.
व्यापारी धोरण
मराठी साम्राज्यांत व्यापारास पुष्कळ प्रकारांनी उत्तेजन देण्यांत येई. इंग्रज, फिरंगी वगैरे परकीय व्यापाऱ्यांस फार सवलती असत; व्यापारी मालावर जकात थोडी असे. दुष्काळ वगैरे पडल्यास सरकार व्यापाऱ्यांना ठराविक स्वस्त दरानें विक्री करण्यास सांगे व प्रसंगविशेषी स्वतःही दुकाने काढून प्रजेचा जीव वाचवी. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा व्यापार सरकारने आपल्या हातीं ठेविला होता. साम्राज्याच्या वसाहतींना व नोकरांना जकातीच्या बाबतीत बऱ्याच सवलती असत. माळवा, बुंदेलखंड, वऱ्हाड, खानदेश, मावळ, कर्नाटक वगरे प्रांत निरनिराळया हवापाण्याचे व निरनिराळे पदार्थ व वस्तू उत्पन्न होणारे असल्याने अनेक दृष्टींनी साम्राज्यांतून सुबत्ता नांदत होती.
साम्राज्याची दरबारी भाषा अर्थातच मराठी होती. मात्र इंग्रज, मोंगल, टिप्पू वगैरे परराजांशी पत्रव्यवहार फारशी भाषेंत होय. ते दरबारही मराठी साम्राज्याशी पत्रव्यवहार फारशीतच करीत. पण याखेरीज साम्राज्यांत सर्वत्र मराठी भाषा वापरीत. लेखन मोडी लिपीत चाले. वसाहती केलेल्या लोकांनी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपीचाही प्रसार हिंदुस्थानांत सर्वत्र केला. मद्रासकडे ५०-६० वर्षांपूर्वी व म्हैसून कडे २५-३० वर्षांखली इंग्रज व म्हैसूरकारांच्या कचेरीतील बरेंचसें लिखाण मोडींत चालू होते आणि अद्यापिही कर्नाटकांत जमाखर्चांत भाषा कानडी परंतु लिपी मोडी असा प्रकार आढळतो.
संदर्भ: महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड १८ बडोदे – मूर (१९२६) व नकाशा Maps of India
Review Overview
User Rating !
Summary : स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.
मला थेउर गणपती मंदिराजवळील व मोरगावहून बारामतीस जाताना बारामतीच्या आधी डाव्या हातास रस्त्यावरून दिसणारी पुरातन वास्तु या विषयी कोणास माहिती असल्यास कृपया शेअर करावी