Home » शिवचरित्र » छत्रपती शाहू महाराज » छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज

१८ मे १६८२ रोजी उत्तर कोकणात रायगड किल्ल्याच्या जवळच गांगवली, माणगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी शाहू राजांचा जन्म झाला, जन्मनाव ठेवले होते ‘शिवाजी‘.

Chatrapati Shahu Maharaj - छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून बालशिवाजी व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर स्त्री-पुरुष सेवक बालशिवाजीसोबत कैद झाले होते. पुढे औरंगजेबाने बालशिवाजीना राजा म्हणून मान्यता आणि ७ हजारांची मनसबही दिली. औरंगजेबाची कन्या झीनत उन्निसाबेगम हिने बालशिवाजी व त्यांच्या परिवाराची चांगलीच काळजी घेतली. शाहू महाराजांचे जन्म नाव शिवाजी असले तरी औरंगजेब त्यांना शाहू असे म्हणत. नोव्हेंबर १७०३ मध्ये औरंगजेबाने शाहू राजांचा विवाह कण्हेरच्या शिंदे घराण्यातील मुलीशी लावून दिला. याआधी दिल्लीत शाहू राजांचा विवाह मानसिंहराव रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या अंबिका ऊर्फ राजसबाई यांच्याशी झाला होता; परंतु त्या तेथेच वारल्या होत्या. पुढे फेब्रुवारी १७०७ मध्ये औरंगजेब मृत्यू पावला. त्याचा पुत्र आजम पदारूढ झाला. त्याने झीनतउन्निसा व जुल्फिकारखान यांच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्यात छत्रपती पदात अंतर्गत कलह माजविण्यासाठी शाहूराजांची सुटका केली.

औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहू राजांचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. राजाराम महाराजांची पत्नी ताराराणींचे अनेक सरदार शाहूंच्या पक्षात सामील होत होते. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी धनाजी जाधव शाहू राजांना येऊन मिळाले. शाहू राजे चाकणच्या किल्ल्यावर व नंतर चंदन गडावर आले. म्हणून ताराराणी आपल्या छत्रपती शिवाजी या पुत्रासह सातारा सोडून पन्हाळा गडाच्या आश्रयाला गेल्या. शाहू राजांनी सातारा काबीज केले आणि १२ जानेवारी १७०८ मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून सिंहासनारूढ झाले. त्यांनी अष्ट प्रधान मंडळ नियुक्त केले त्यात बहिरोपंत पिंगळे यांस पेशवेपद व धनाजी जाधव यांना सेनापती पद दिले.

शाहू महाराजांचा शिक्का,

श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः । सा मूर्तिरिव वामनी ।।
शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

स्वराज्याची सनद
सन १७१९ मध्ये मराठे व मोगल यांमध्ये झालेला महत्त्वाचा करार:
१) शिवाजी महाराजांच्या वेळचे स्वराज्य, तमाम गडकोट शाहू राजांच्या हवाली करणे.
२) अलीकडे मराठ्यांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवन, वऱ्हाड, हैदराबाद, कर्नाटक या भागातले, यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.
३) मोगलांच्या दक्षिणेतील मुल्खांवर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वत: वसूल करावे. या चौथाईच्या बदल्यात आपली १५ हजार फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी व सरदेशमुखीच्या बदल्यात मोगलांचे मुलखात चोऱ्या वगैरेंचा बंदोबस्त ठेवावा.
४) कोल्हापूरच्या संभाजीस शाहू राजांनी उपद्रव करू नये.
५) मराठ्यांनी बादशहास दर साल दहा लाख रुपये खंडणी द्यावी आणि
६) शाहूची मातुश्री, कुटुंब, संभाजीचा दासीपुत्र मदन सिंग वगैरे दिल्लीस बादशहाचे कैदेत आहेत, त्यांस सोडून स्वदेशी पावते करावे.
संदर्भ: मराठी रियासत खंड ३ – पुण्यश्लोक शाहू

बाळाजी विश्र्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद मिळवण्यासाठी अनेक सरदारांची स्पर्धा चालू होती, पण शाहू महाराजांनी कोणाच्याही विरोधास न जुमानता ही जबाबदारी बाजीराव यांच्यावर सोपवली. तरुण व शूर बाजीरावांबद्द्ल शाहू महाराजांना अतिशय अभिमान व खात्री होती. शाहू महाराज एका पत्रात म्हणतात,

सारे माझेच आहेत. परंतु माणूस असा बाजीराव, मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला, तदाधिक्य बाजीराव! तखारबहाद्दरपणाची पराकाष्ठा, असा पुरुषच नाही!

शाहू महाराज हे सदैव पेशव्यांच्या पाठीशी राहिले, महाराजांना बाजीरावांच्या शौर्याचे व स्वामीनिष्ठेचे कौतुक होते. ‘तुमच्या इतमामास योग्य असे निवासस्थान पुणे येथे बांधा.’ असा प्रेमाचा आदेश महाराजांनी दिला म्हणून थोरले बाजीराव यांनी भव्य शनिवारवाडा बांधला. जगातील स्वामीनिष्ठेचे एकमेवद्वितीय असे वर्तन पेशव्यांच्या हातून घडले. स्वामीनिष्ठा म्हणजे काय हे एक नव्हे तर पेशव्यांच्या पाच कर्तबगार पिढय़ांनी दाखवून दिले.

शाहू महाराजांची राहणी साधी होती, ते निर्व्यसनी होते. तसेच ते उदार, दयाळू आणि कुटुंबवत्सल होते. नेहमीच प्रजेच्या हितासाठी झटत असत. सामान्य लोकांत मिसळत असत. शाहू महाराजांना उत्तम घोडे, कुत्रे, पक्षी बाळगण्याची हौस होती. त्यांनी अनेक बागाही फुलवल्या. वाडवडिलांप्रमाणेच शाहूमहाराज सुद्धा मुस्लिमांचे किंवा इतर धर्माचे द्वेष्टे नव्हते. एवढेच नव्हे तर औरंगजेबाची मुलगी झीनतउन्निसा हिला ते खूप आदर देत होते. बहुतेक इतिहास पंडितांनी पेशव्यांना अवास्तव महत्त्व देऊन छत्रपती शाहूंची कामगिरी झाकळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हाताखालचे प्रधानमंत्री, सेनापती आणि सरदार कितीही शूर असले तरी त्यांना योग्य कामगिरी देऊन त्यांच्याकडून राज्यहित साधून घेण्याचे कौशल्य राजामध्ये हवे, ते शाहू महाराजांमध्ये असल्यामुळेच भोसले, जाधव, शिंदे, होळकर, आंग्रे, दाभाडे, पवार, घोरपडे वैगेरे सरदारांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत मराठी राज्य व संस्कृती यांचा विस्तार गुजराथ, माळवा, बुंदेलखंड, बंगाल, ओरिसा, विदर्भ, कर्नाटक वगैरे प्रदेशात केला.

श्रीमंत पेशवा बाजीराव व मस्तानीचे प्रेम प्रकरण जेव्हा अगदी बाजीरावांच्या घरच्या मंडळींच्या विरोधामुळे विकोपाला गेले त्याची खबर साताऱ्यास छत्रपती शाहूंना लागली व त्याचे पत्र पेशवा चिमाजी आप्पास आले, त्यात तो लिहितो ‘रायास कोणे एकी बिलकुल खट्टे न करणे. रायाच्या मर्जी विरुद्ध होईल ऐसे वर्तन न ठेवणे.’ यावरून शाहू राजांना बाजीरावांची किती काळजी होती हेच दिसून येते. हे अस्सल पत्र रियासत कारांना उपलब्ध झाले आहे.

एकापेक्षा एक बलाढ्य सरदार पदरी असल्यामुळे शाहू महाराज स्वतः मोहिमेवर जात नसत. बाजीरावांसारख्या पेशव्यास त्यांनी थोडे स्वातंत्र्य दिले असले तरी त्यास पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवले होते. शाहू राजांनी पेशवा बाजीराव व चिमाजी आप्पा ह्या दोन्ही बंधूंस त्रिंबकराव दाभाडे यांच्या खुनाबद्दल त्यांची विधवा आई उमाबाई यांच्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागायला लावली होती. कारस्थाने करणाऱ्या बाळाजीस बडतर्फ केले होते. यावरून मृत्यूपर्यंत शाहू महाराज किती प्रभावशाली होते हे स्पष्ट होते. आपल्या ४२ वर्षाच्या कारकिर्दीत चिमुकल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले ही शाहू राजांची महान कामगिरी म्हणावीच लागेल.

छत्रपती शाहूं महाराजांनी सेनापती यशवंत राव दाभाडे यांना १७३१-३२ साली लिहिलेले पत्र,

राजमान्य राजश्री यशवंतराव दाभाडे सेनापती यांसी आज्ञा केली ऐसीजे. राजश्री बाजीराव पंडित प्रधान उत्तर प्रांतास जातात, त्यास आपली फौज जमा करणे म्हणून तुम्हास आज्ञा केली होती. परंतु फौज त्या समागमे दिली नाही व हुजुरही यावयाचा प्रसंग जाला नाही. रनाल्यास कालहरण करीत राहिले आहा, यावरून काय म्हणावे? तुम्ही सेनापती आणि नूर तुमची, सेवा करून जग नामोष करून घ्यावयाची होत असता ईरे व उमेद धरीत नाही. तेवा पुढे आता तुमचे हाते काय होणे! हल्ली राजश्री प्रधानपंत व निजाम उल्मुल्कास समीपता होऊन गांठ पडली असेल. औरंगाबादची फौज जमा जाहली आहे,ते निजामाकडे कुमकेस जाणार. गेलीयाने निजाम भारी होईल. याजकरिता इकडेच अडकवून पदवी,जाऊ न द्यावी असे आहे.तरी तुम्ही आपले सारे फौजेनिशी राजश्री चिमणाजी बल्लाळ यास शिताबीने सामील होऊन स्वामी संतोषी होत असे करणे. बहुत शिताबीने जाणे. घालघासरीवर सर्वथा न घालणे. सुज्ञ असा.’

संभाजीराजे (राजाराम पुत्र) निजामास जाऊन सामील झाले. खालील पत्रात मराठी राज्याचे एकंदर हेतू व शाहू महाराजांची ततसंबंधी भावना यांचे उत्कृष्ट वर्णन आज आपणास उपलब्ध आहे ते असेः

‘महाराजांनी सर्व प्रधान बोलावून विचार केला जे, संभाजी राजांनी मनात दूर्बूद्धी धरली आहे. हे राज्य श्रीचे कृपेंचे, थोरले महाराजांपासोन (छ.शिवाजी)आजपर्यंत साध्य करण्यास कोण प्रयास लागले. म्हणोन त्यास पत्रे लिहिली जे,’ हे राज्य श्रींचे, यवनांचे आश्रयास जाऊन जय कसा येईल. तुम्हास राज्यलोभ बहूत होता तर आम्हास सांगोन पाठवायचे होते.आम्हापासी सेवकलोक दिगंत प्रताप करणारे आहेत. त्यातील तुमचे बरोबर देऊन एखादे राज्य साधून दिले असते. किंवा तुम्ही पराक्रम करून दाखवावा होता. किवा आम्ही यवनांनी घेतलेले राज्य पुनः सोडवीतो, तसे तुम्हासहि याखेरीज सोडवीता आले असते. आम्ही सोडविल्यापैकी विभाग मागावा ही काय नीती! कै. राजारांसाहेबांनी चांदीस जाऊन फौज व दौलत जमविली. तेथून देशी येऊन स्थळे लुटली, ख्याती केली. आम्ही नजरबंदित असता आमचे ठायी कसे लक्ष ठेवीले हे तुम्ही जाणत असोन, आता यवनाचा आश्रय करावा हे विहित नव्हे. हरप्रकारे निघोन यावे. तुम्हास दौलत पाहिजे ती आम्ही नवीन सिद्ध करून देऊ.पण राज्याचा वाटा मागणे पुराणांतरी जाहाले नाही. ही बुद्धी सोडावी. सेनापती चंद्रसेन (धनाजी जाधवांचा पुत्र) सेवक असोन हरामखोरीने लढाई करोन यवनास शरण गेले, महाराष्ट्र राज्य व धर्म सोडला, तेही मोठे कुळिंचे रामदेवराव जाधावांचा वंश. त्यांची तुम्ही अनुकुलता करून यवनांचा आश्रय करणे फार वाईट.’

जयपुरच्या सवाई जयसिंगास दिल्लीच्या बादशाहने आज्ञा केली की सातार्‍यास वकील पाठवून मराठ्यांचे ठायी नक्की काय मनसुबे आहेत याचा मागोवा कळविण्यात यावा. तेव्हा त्याचा दीपसिंग नावाचा वकील छत्रपती शाहू राजांना भेटून पुढे निजामाची भेट घेण्यास गेला, तेव्हाचे शाहू राजांच्या दरबाराचे वर्णन विशेष अभ्यसनीय व इतिहासोपयोगी आहे.

निजामः तुम्हास सातारा येथे मातबर मनसुबेबाज व महाराजांचा इतबारी असा गृहस्थ कोण आढळला?
दीपसिंगः यासाठीच तर मला मुद्दाम जयसिंगांनी सातार्‍यास पाठविले. बाजीराव प्रधानांची मर्दुमी व नाव मुलखात फार गाजते, तर त्याची गिरंबारी व मुत्सदेगिरी, मान, आदर राज्यात व बोलोन चालोन पोख्त कारभारी कोण आहे ते मनास आणून येणे म्हणोन जयसिंगांनी आम्हास पाठविले होते.
निजामः मग असा मातबर पोख्तकार,साहेबतरतूद, राजा मेहरबान, गिरंबार, असा तेथे तुम्हांस कोण आढळला?
दीपसिंगः एका बाजीराउजीशिवाय आणिक कोणी सत्यवचनी, प्रामाणिक, पोख्तकारी, चलनसाहेब्फौज दुसरा दिसत नाही.
निजामः राजा खुद्द कसा आहे? दीपसिंगः राजाही बहुतच खुब्या राखतो.
निजामः आम्ही ऐकिले की तो कित्येक गोष्टी हलकेपणाच्या ऐकतो.
दीपसिंगः ते जर मजलसीच्या सल्याने न चालत तर राज्य कसे चालते? राजे मोठे शहाणे,विवेकी आहेत.जाबसाल उत्तम करितात.

छत्रपती शाहू व बाजीराव यांच्या योग्यतेचा हा त्रयस्थाचा किंबहुना विरुद्ध पक्षाचा अभिप्राय प्रमाण व बहुमोल मानला पाहिजे.
करवीर येथे ताराराणींचा पुत्र शिवाजी हा छत्रपती होता. पण ताराराणींची सवत राजसाबाई यांचा पुत्र संभाजी याने शिवाजीस पदच्युत करून करवीरची गादी काबीज केली. समेट घडवून आणण्यासाठी शाहूराजे अधिक उत्सुक होते. गृहकलह लवकर मिटावा व शत्रूचा बिमोड करावा म्हणून शाहू महाराजांचे प्रयत्न होते. महाराणी येसूबाई सुटून आल्यावर त्यांच्या सांगण्यावरून शाहू महाराज यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे यांच्याशी तह केला. कऱ्हाडजवळ कृष्णेकाठी जखिणवाडी येथे भव्य मंडपात शाहू व संभाजीराजे यांची भेट झाली. या तहात वारणा नदीच्या दक्षिणेकडील मुलुख, किल्ले, ठाणी, संभाजी राजांस देवून दोघांमध्ये स्नेह झाला. वारणा नदी ही सरहद्द ठरल्यामुळे यास वारणेचा तह म्हणतात. संभाजी राजांशी स्नेह करून शाहू महाराजांनीनी मराठ्यातील कौटुंबिक प्रेम प्रदर्शित केले.

रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ८ जून १७३३ रोजी मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला.[/hightlight] रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूमहाराजांनी २० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे,

घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. रा. शिवाजीमहाराज व रा. आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराममहाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम्‌ । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.

बाजीरावांच्या दिल्ली स्वारीवर शाहू महाराजांनी केवढी भिस्त ठेविली होती आणि बाजीरावांवर त्याचा केवढा लोभ होता हे खालील पत्रात व्यक्त होते,

‘राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यास आज्ञा केली ऐसीजे. प्रस्तुत तुम्हाकडून विनंतीपत्र येऊन वर्तमान कळत नाही. कोठे आहात, काय विचार, पुढे कोठपर्यंत जाणार, मुख्य आमीरसहवर्तमान काय करीत आहेत, हे सविस्तर दिनप्रतीदिन लिहित जाणे. सांप्रत आगरेयानाजिक गेलेच असाल. पलीकडील भेटीचा विचार घडणार म्हणून परस्पर ऐकीजेते. ऐशियास मोगली मनसुबा, ईमान देऊन आपला मतलब साधितील. त्यांचा विश्वास मानवा ऐसा अर्थ नाही.याजकरिता शहरात जाऊन भेट घ्यावयाचा मनसुबा करीत असाल तर सर्वथा न करणे. भेट न घेता दुरूनच ज्याचे हाते तुमचे राजकारण असेल त्यापासून आपले मतलब साधावयाचे ते साधणे. हावभारी होऊन त्याचे विश्वासावरी जाल याजकरिता लिहिले आहे. तुम्ही बुध्मंत कार्यकर्ते यशस्वी सेवक आहात. वीचारास चुकणार नाही हा स्वामीस निशा आहे.तरी बहुत विचारे करून जे करणे ते करून आपली बाजू सर करून येई ते करणे. पलीकडील अमीर तुम्हासी विवेकावरी आहेत, आणि नबाब (निझाम) उल्मुल्क इकडून फारच वळवळ करून त्या प्रान्ते येत आहेत. त्यांचा विचार काही कळत नाही तरी बहुत सावधपणे मनसुबा करणे. मोगली विचार तुम्हास न कळेसा तो काय आहे! आपला नक्ष राहून, योजिला मनसुबा सिद्धीस पावे,ते गोष्ट करणे. जो विचार करीत असाल व घडन येत असेल,तो वरचेवरी हुजूर लेहून पाठवीत जाणे. वरकड सविस्तर रा.महादजी अंबाजी (शाहुंचा मुतालिक) लिहितील त्याजवरून कळो येईल. आन वृत्त दिनचर्येचे वरचेवर लिहीन. फुड मनसुबा काय व बोलो काय मुद्याची तेही लिहीन. फुड कोठवर जान तेही लिहीन. त्याची मूखभान आहे यावर न जान. त्याचे वाटे कदाचित भातीचा प्रसंग पडला तर लिहीन. बहुत काय लिहीन सुदन असा.’

उदात्तता हा शाहू महाराजांचा एक मोठा गुण होता, साहित्य दर्पणकार धीरोदात्त पुरुषाचे वर्णन करताना जे म्हणतात

‘अविकत्थनः क्षमावानतिगंभीरो महासत्त्वः । स्थेयान्निगूढमानो धीरोदात्तो दृढवतः कथितः ।।’

ते सर्व गुण महाराजांच्या अंगी होते. अशा धीरोदात्त, कुशल प्रशासक व उत्कृष्ट सेनानीचे निधन १५ डिसेंबर १७४९ रोजी झाले.

संदर्भ: मराठी रियासत खंड ३ – पुण्यश्लोक शाहू

छायाचित्र: छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई

१८ मे १६८२ रोजी उत्तर कोकणात रायगड किल्ल्याच्या जवळच गांगवली, माणगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी शाहू राजांचा जन्म झाला, जन्मनाव ठेवले होते ''. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून बालशिवाजी व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर स्त्री-पुरुष सेवक बालशिवाजीसोबत कैद झाले होते. पुढे औरंगजेबाने बालशिवाजीना राजा म्हणून मान्यता आणि ७ हजारांची मनसबही दिली. औरंगजेबाची कन्या झीनत उन्निसाबेगम हिने बालशिवाजी व त्यांच्या परिवाराची चांगलीच काळजी घेतली. शाहू महाराजांचे जन्म नाव शिवाजी असले तरी औरंगजेब त्यांना शाहू असे म्हणत. नोव्हेंबर १७०३ मध्ये औरंगजेबाने शाहू…

Review Overview

User Rating !

Summary : आपल्या ४२ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले ही शाहू महाराजांची महान कामगिरी म्हणावीच लागेल. उदात्तता, कुशल प्रशासक हे शाहू महाराजांचे गुण होते.

User Rating: 3.48 ( 6 votes)

7 comments

  1. Ravindra patil

    Thanks for sharing a true history. With original documents. विंग कमांडर जी , औरगजेब ने प्रत्यक्ष कोणत्याही लढाईत भाग घेतला होता असे दिसत नाही.

  2. Dhannevad sir

  3. Somnath Ramdas Gaidhani

    छत्रपती शाहू महाराजांनी १७३६ ते ३९ साली सरदार उदाजी चव्हाण ह्या बंडखोरांवर स्वतः स्वारी केली होती . त्या वेळी मिरज हे लष्करी ठाणं मुघलांकडे होते , ते सुद्धा जिंकून घेतले .
    शाहू महाराजांनी स्वतः मोहिमा केल्या नाहीत कारण ते योग्य व्यक्तीला निवडून मोहीम त्याच्या हाती द्यायचे आणि त्यांना मार्गदर्शन आणि वेळोवेळी सूचना , आज्ञा करायचे. मोहिमेवर बारीक लक्ष ठेऊन असायचे .

  4. निलेश लिंभोरे

    नाना साहेब पेशव्यास यमाजी शिवदेवच्या खोट्या साक्षीने व महाराणी सकवारबाई यांच्या दबावाने आजारपण असताना पेशवे पदावरून काढल्याच्या पञावर शाहु महाराजांनी दुर केले होते व नंतर रघोजी भोसले व चिटणीस गोविंदपंत यांच्याशी गोपनीय बैठक करून पुन्हा नानासाहेबास मराठा दौलतीचे पेशवा केले ते ही दरबार भरूऊन.

  5. विंग कमांडर शशिकांत

    नमस्कार, असे काय कारण असावे कि त्यामुळे शाहूमहाराज दिल्लीच्या राजाच्या हातून सुटल्यावर त्यांनी स्वतः राजा म्हणून काहीच सैनिकी लढायात नेतृत्व केले नाही? त्यांना सोडवताना अशा काही अटी मान्य केल्या का की त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष राजेपण सैनिकी कमांडर म्हणून कैदेतून सुटका केली होती?

    • निलेश लिंभोरे

      नाही शाहुंना शस्ञविद्या अवगत होती, कोल्हापुरकर संभाजी विरूध्द मोहीम त्यांनी केली आहे. थोरले वारसदार असल्याने समस्त सरदार, मंञीगण त्यांकडे असल्याने त्यांना विषेश लढाई करावी लागली नाही.

  6. Apratim Lekh Shahu Maharajanvar- Aisa Punyashlok Raja punha hone nahi…Satara Yethe Kimaan Ek tari statue Shahu cha Pahije…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.