मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला ।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।।
वरील दोन ओळींतच खर्या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतून मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.
संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल. अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते.
अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.
Review Overview
इतिहासाचा मागोवा
User Rating !
Summary : मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला । शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।।
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला ।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।।
jay roudra shambho