Home » शिवचरित्र » महाराणी ताराबाई » महाराणी ताराबाई

महाराणी ताराबाई

महाराणी ताराबाई - Maharani Tarabai

दिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला.

यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे त्यांचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे (छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यापासुन) सतत चालणारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांना जणू अंगीच पडला होता. केवळ २४ ते २५ वर्षांची एक विधवा स्त्री, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याच्याशी लढा देते व पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.
मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी बलाढ्य मुघल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून थेट माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली. १७०० ते १७०७ या कालखंडात शेकडो लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन महाराणी ताराबाईंनी राज्य जिंवत ठेवले ईतकेच नव्हेतर वाढविले सुध्दा.

महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले, त्याविषयी कवि विठ्ठलदास लिहीतात,

पाटील सेटे कुणबी जुलाई
चांभार कुंभार परीट न्हावी
सोनार कोळी उदिमी फुलारी
या वेगळे लोक किती बेगारी

ह्या साडेसातवर्षांच्या लढाईच्या काळात फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले.

एका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व काय केलं आहे हे मल्हाररावांनी मांडले; त्या पत्रात म्हटले आहे,

आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांचा सैन्यासभोवते हिंडोन, फिरोन त्यांस लांडगेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखुन रानातील वैरण जाळुन टाकावी: रसद चालु देऊ नये; आपल्या फौजेत मनाची धारन, त्यांचा लषकरात शेराची; अशा तर्हेने करीत मराथी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे

स्वतः महाराणी ताराराणींनी अनेक चढाया मारलेल्या होत्या. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसण्यापेक्षा त्यांनी मराठी सैन्याच्या रक्तात नवचैतन्य निर्माण काम केले.

राजाराम महाराज जायच्या आधीच मोगलांनी साताऱ्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे घातले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की शाधारण १५० किलोमीटरमध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वतः ओरंगजेबासोबत १,५०,००० सैन्य या भागात वावरत होते.
सर जदुनाथ सरकार लिहीतात,

किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलटमोगलांचेच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येण्याजाण्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येणे अशक्य झाले होते.

मराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी होत होती. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली?
विशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मराठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडाच्या मोहीमेत बादशहाची ६,००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्यानी गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसले, उत्तरेत घुसण्याचा पहिला मान नेमाजी शिंदेंचा. ३०,००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिणेत असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजींनी ऊडवली.
माळव्यात झालेला प्रकार पाहून बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०,००० रुपये घेऊन किल्ला सोडला. बादशहाने सिंहगड किल्ल्याचे बक्षिंदाबक्ष असे नामकरण केले व पुण्यास येऊन सहा ते आठ महीने राहीला. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल १७०३ मध्ये अनुक्रमे वरील किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.

तिकडे धनाजी जाधव आपल्या १५,००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले व त्यांनी बादशहाच्या हंगामी सुभेदार अब्दुल हमीदला कैद केले. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन ते स्वराज्यात परत आले. १,५०,००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिणेत आला होता, तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही. तो स्वतः दक्षिणेत राहून स्वाऱ्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तीन वेळेस बदल झाला. आधी संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज व पुढे महाराणी ताराबाई, एवढे बदल होऊनही औरंगजेबास स्वराज्य काही घेता आले नव्हते. ह्या सर्व गोष्टींमुळे आता मात्र तो अंत्यत निराश झाला होता, देवाकडे मदत मागत होता पण त्याचाही देव सध्या भद्रकालीच्या बाजुने होता. मोगली लष्करातील एक आख्खी पिढी (२५ वर्षे) त्याने दक्षिणेत राबविली पण हाती ठोस काहीच लागले नव्हते. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट औरंगजेब अत्यंत निराश अवस्थेत, २० फेब्रुवारी १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट! पुढील अवघ्या तीन महिन्यातच महाराणी ताराराणींनी अनेक चढाया मारत सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेत स्वराज्यात आणले.

कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात,

दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा ||

सर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले होते.

माळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जमशहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहाआलमचा विरोध मोडण्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व २० वर्षे दक्षिणेत असलेल्या झुल्फीकार खानाने सल्ला मसलत करुन ८ मे १७०७ रोजी शाहूराजेंना कैदेतुन मुक्त केले. शाहूराजेंना मुक्त करण्यामागे मराठेशाहीत फूट पडणार हे दिर्ध राजकारण या दोघांनी खेळले. शाहुराजे हे संभाजी महाराजांचे पुत्र असल्यामुळे ते दक्षिणेत जाऊन राज्य वापस मागतील व त्यांना जिवंत सोडल्याच्या उपकाराला जागुन ते मोगलांच्या बाजूने राहतील हे झुल्फीकाराला वाटले असावे. ऑगस्ट २००७ ला शाहुराजे अहमदनगरला आले व राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिणगी पडली नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसले, रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुराजेंना येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला.

महाराणी ताराराणींचे असे म्हणने होते की संभाजी राजांच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजाराम महाराजांनी राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य त्यांनी स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहुराजांकडून तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराराणींकडून झाले. शाहु महाराजांच्या म्हणन्यानुसार राजाराम महाराजांना राज्य राखण्यासाठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्यांचे काम होते. स्वतः राजाराम महाराज देखील तसेच मानत होते, पण जे राज्य महाराणी ताराराणींनी पुन्हा निर्माण केले, वाढविले त्यावर त्या हक्क सोडायला तयार नव्हत्या. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना, सामोपचाराच्या मार्गाने शाहु महाराजांना आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहु महाराजांच्या पक्षात येणार नाहीत तो पर्यंत आपली जित नाही हे त्यांनाही उमजले होते. त्यांनी बाळाजी विश्वनाथरावांना धनाजींना आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजींनी ते कार्य सफल केले, धनाजी जाधव शाहु महाराजांना येऊन सामील झाले. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू महाराज विजयी झाले, या विजयामूळे त्यांचे धैर्यही वाढले आणि सेनाही.

कान्होजी आंग्रेनी बंडावा करुन स्वराज्यातले काही किल्ल्यांवर कब्जा केला व प्रतिनिधीस अटक केली. शाहु महाराजांनी ते बंड मोडण्यासाठी बाळाजी विश्वनाथरावांना पेशवेपद देऊन पाठविले व कार्य यशस्वी झाले. सर्व मोठे सरदार, महत्वाचे किल्ले शाहूराजांकडे आल्यामुळे महाराणी ताराबाईंची बाजु कमकुवत पडली. त्यांनी वारंवार शाहू महाराजांशी भांडण मांडले पण ते पुर्ण झाले नाही. होता होता शाहू महाराजच बळकट झाले, १२ फेब्रुवारी १७०८ रोजी शाहू राजांचा राज्याभिषेक झाला.

इकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहाआलमचे युध्द झाले त्यात शहाआलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य नव्हते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहू महाराजांची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देण्यामागे शाहू महाराजांना असे वाटत असावे की आज्जमशहा ने जे कागदपत्र त्यांना दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मराठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिणेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखानाने ही मागणी उचलून धरली, त्यालाही लगेच युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईंचेही लोक बादशहाला भेटायला आले व त्यांनीही तशीच मागीतली केली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली बादशाह शहाआलम दिल्लीला परत गेला व २६ वर्षांनंतर मराठी राज्यास थोडीफार शांतता लाभली.

सत्ता शाहू महाराजांकडे न जाता महाराणी ताराराणींकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळणार नाही कारण इतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा इथे उपयोगी नाही.

संदर्भ:
जेधे शकावली
केशवपंडित विरचित ‘राजारामचरितम’
मल्हार रामराव चिटणीस बखर
करवीर रियासत
शिवदिग्विजय बखर
तारीख–ए–दिलकुशा
फुतुहाते आलमगिरी
मासिरे आलमगिरी

छायाचित्र: ‘The Great Marathas’ by V. R. Raghu (1870-1946)

दिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे त्यांचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे (छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यापासुन) सतत चालणारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांना जणू अंगीच पडला होता. केवळ २४ ते २५ वर्षांची एक विधवा…

Review Overview

User Rating !

Summary : छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे महाराणी ताराबाईंनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

User Rating: 4.17 ( 25 votes)

3 comments

  1. ताराराणी साहेबांचा पूर्ण इतिहास हवा अहे

  2. Sandeep Bhaskar Naik

    Purandhar cha ladha. MURARBAJI ANI PANIPAT BADDAL MAHITI HAVI AAHE

  3. vedant bhosale

    kanhoji aangrenchya bandava vishayi adhik mahiti dyavi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

शिवराय प्रश्नमंजुषा - प्रश्न क्रमांक १४ ताराबाई

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४ इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या ...