Home » शिवचरित्र » थोरले बाजीराव पेशवे » मराठे – निजाम संबंध
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५) - Ahmednagar fort interior
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५) - Ahmednagar fort interior

मराठे – निजाम संबंध

दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती.

हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या मृत्यूनंतर थोरल्या बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. पहिल्या बाजीरावांनी सत्तेवर येताच दक्षिणेतील मराठी राज्याचे रक्षण करून उत्तरेकडे जास्तीजास्त वर्चस्व प्रस्थापिण्याचे धोरण आखले. निजाम आपणास मोगल बादशाहीचा सुभेदार समजून सर्व दक्षिणेवर हक्क सांगत होता. या परिस्थितीत संघर्ष अनिवार्य होता. या संघर्षाला मराठ्यांनी कसे तोंड दिले आणि लढायांत त्याचा पराभव करून त्याला आपले दुय्यम सहकारी कसे बनविले, हाच जवळजवळ दक्षिणेतील अठराव्या शतकाचा इतिहास आहे.

इ. स. १७२३ आणि १७२४ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या भेटींत त्याचा वरकरणी स्‍नेहपूर्वक गौरव करून ते कर्नाटकच्या स्वारीत गुंतले असता १७२६ मध्ये महाराष्ट्रात निजामाने छत्रपती शाहू महाराजांच्या वाढत्या सत्तेला पोखरून काढण्यास सुरूवात केली. त्याने कोल्हापूरच्या संभाजी राजांस हाताशी धरून मराठ्यांचा तोच खरा राजा आहे, असा दावा मांडला व संभाजी राजांसह छत्रपती शाहू महाराजांचा प्रदेश लुटण्यास सुरूवात केली (१७२७). या प्रसंगी छत्रपती शाहू महाराजांनासुद्धा निजामाच्या या उपद्व्यापातून पडते घेतल्याशिवाय सुटका होणार नाही, असे वाटू लागले होते; पण बाजीराव पेशवे कर्नाटक स्वारीहून महाराष्ट्रात येताच ही परिस्थिती पालटली. सन १७२८ मध्ये थोरल्या बाजीरावांनी निजामाशी लढण्यासाठी व्यूहरचना करून निजामाच्या मराठवाड्यातील प्रदेशांवर हल्ले केले. तेव्हा निजामाने त्याचा पाठलाग सुरू केला. थोरल्या बाजीरावांनी त्याला हुलकावण्या देत, खेळवीत पालखेड येथे अडविले. अशा अडचणीच्या जागी पालखेडला सामोपचाराशिवाय सुटका होण्यासाठी दुसरा उपायच निजामाला उरला नाही. पालखेडची लढाई युद्धनेतृत्व व लष्करी हालचालींची चपलता आणि कौशल्य या दृष्टींनी महत्त्वाची मानली जाते. इतिहास प्रसिद्ध पालखेडच्या लढाईत थोरल्या बाजीरावांच्या युद्ध कौशल्यामुळे निजाम नमला; तथापि त्याचे मराठेशाहीविरूद्ध प्रयत्‍न बंद पडले नाहीत.

गुजरातेत सेनापती दाभाडेंशी संघान जुळवून निजामाने त्यांना छत्रपती व पेशवे यांच्या विरूद्ध प्रवृत्त केले; पण १७३१ मध्ये थोरल्या बाजीरावांनी डभोई येथे दाभाड्यांचा पराभव करून निजामाच्या कारस्थानाची वाट लावली. त्यानंतरही आपले उद्योग न थांबवणार्‍या निजामास बाजीरावांनी भोपाळच्या युद्धात चांगलाच हात दाखविला. १५ डिसेंबर १७३७ मध्ये बाजीरावांपुढे हार खाऊन निजामाला दोराहसराईच्या तहान्वये स्वत:चा बचाव करून घ्यावा लागला. इ. स. १७४० च्या आरंभी निजामाचा मुलगा नासिरजंग याच्या मराठ्यांविरोधी चळवळी पाहून थोरल्या बाजीरावांनी त्याला पराभूत करून त्याच्याकडून खरगोण व हांडे ही दोन सरकारे मिळविली. अशा रीतीने दिलावर अलीखान, आलम अलीखान, मुबारिझखान या मुसलमान सरदारांवर जय मिळविणार्‍या पहिल्या निजामाची थोरल्या बाजीरावांसमोर एकदाही मात्रा चालू शकली नाही.

इ. स. १७४० मध्ये थोरल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यास पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. नानासाहेबांची कारभाराची सुरूवातच निजामाने त्याच्या मुलाविरूद्धच्या लढाईत मदत मागण्याने झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. इ. स. १७४८ च्या मे महिन्यात तो मरण पावला. १७४० ते १७४८ या आठ वर्षात निजामाच्या बाबतीत मराठेशाहीत बाबूजी नाइकाने केलेल्या कर्नाटक प्रकरणाखेरीज दुसर्‍या कटकटी उद्‍भवल्या नाहीत.

छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावास दोन अडीच वर्षे अंतस्थ कलहास तोंड द्यावे लागले. निजामाच्या घरातही सत्तास्पर्धा सुरू होऊन कलह माजला होता. १७५० ते १७५२ या दोन वर्षाच्या काळात त्या कलहाने निजामुल्मुल्कचा दुसरा मुलगा नासिरजंग व मुलीचा मुलगा मुझफ्फरजंग यांचे बळी घेतले. त्यामुळे निजामुल्मुल्कचा तिसरा मुलगा सलाबतजंग याच्याकडे निजामशाहीची सूत्रे आली. त्याचा दिवाण रामचंद्रपंत ऊर्फ रामदास याच्या प्रेरणेने १७५१ मध्ये पेशव्यांशी ज्या झटापटी झाल्या; त्यांत पानगल, पारनेर, कुकडी नदीवरील हल्ला, मलठणची लढाई व सिंगव्याचा तह ही स्थळे व घटना महत्त्वाच्या आहेत. पानगलास सलाबतजंगाने तह केला असता पेशव्यांचा उत्तरेकडून पुण्यास जाणारा खजिना लुटून सलाबतजंगातर्फे रामचंद्रपंतानी कुरापत काढली. तिचा सिंगव्याचे तहाने शेवट होण्यापूर्वी दोनदा बलाजींचा पराभव झाला; पण मलठणच्या लढाईत या पराभवाचा वचपा निघाला. सलाबतजंग सत्तेवर असतानाच दिल्लीहून पहिल्या निजामाचा थोरला मुलगा गाजीउद्दीन फीरोजजंग मराठ्यांच्या साह्याने बादशाहचा आशिर्वाद व परवाना घेऊन दक्षिणेची वाटचाल करू लागला. बाळाजी बाजीराव व त्यांचे उत्तरेकडील प्रतिनिधी शिंदे – होळकर यांनी आपल्या मदतीपोटी गाजीउद्दीनमार्फन निजामी प्रदेशाचा मोठा तुकडा मराठेशाहीच्या पोटात जिरविण्याचा डाव टाकला. इ. स. १७५२ मध्ये गाजीउद्दीन दक्षिणेत येताना विषयप्रयोगाने मृत्यू पावला; तरी मराठ्यांनी अगोदरच सलाबतजंगास शह देऊन मालकीच्या तहान्वये खानदेशचा प्रदेश मराठी साम्राज्यास जोडला होता.

निजामशाहीत १७५२ नंतर सलाबतजंगाचे भाऊ निजाम अली, बसालतजंग, मिर मोगल यांची आपसांत धुसफूस चालू होती. मराठ्यांच्या मदतीशिवाय हे सर्व भाऊ दुबळे झाले होते. वर्‍हाड व विजापूर येथील सुभेदारीवर अनुक्रमे निजाम अली व बसालतजंग यांची नेमणूक बाळाजी बाजीरावाच्या सल्ल्याने झाली. सलाबतजंगाचे दिवाण शहनवाजखान व सय्यिद लष्करखान या दोघांचे मराठ्यांशी अंत:स्थ संघान होते, अशी माहिती देणारी अनेक पत्रे मराठी पत्रव्यवहारांत आढळतात. सलाबतजंगाच्या बंधूमध्ये निजाम अली हा महत्त्वकांक्षी व धडपड्या होत्या. निजामशाहीत त्याचे वर्चस्व वाढू नये म्हणून व त्याच वेळी निजामशाहीत चंचूप्रवेश करणार्‍या फ्रेंचांचे वर्चस्व कमी करण्यासाठी बाळाजीने शक्य तेवढी खटपट केलेली दिसते. सिंदखेड येथे मराठे व निजाम अलीचे युद्ध होऊन निजामाच्या पराभवाने मराठ्यांना २५ लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळाला. यावेळी निजाम अली व फ्रेंच सेनापती यांच्यात वितुष्ट येऊन त्याचे पुन्हा एकदा हत्याकांडात रूपांतर झालेले दिसते; पण यानंतर फ्रेंच सेनापती निजामाच्या राजकारणातून कायमचा बाहेर पडला.

इ. स. १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊंनी काढलेल्या मोहिमेत निजामाचा उद्‍गीरच्या लढाईत पराभव होऊन मराठ्यांना अंबड, फुलमडी, नांदेड इ. साठ लाखांचा प्रदेश आणि अशेरी, मुल्हेर, दौलताबाद हे किल्ले आणि बर्‍हाणपूर, विजापूर एवढे प्रदेश मिळाले. तसेच निजाम अलीने एलिचपूर येथे व सलाबतजंगाने हैदराबादेस रहावे असे ठरले. यानंतर पानिपतचा पराभव व नानासाहेबांचा मृत्यू या घटना घडल्या. मराठेशाहीची धुरा माधवराव पेशव्याच्या खांद्यावर आली. या काळातील निजाम अलीची पुण्यावर चढाई (१७६१), त्याची राघोबाशी हातमिळवणी व माधवराव पेशव्यांची लढाई, पुण्याची जाळपोळ व त्यानंतर उभयपक्षांच्या चढाओढीची राक्षसभुवनाच्या लढाईत झालेली परिणिती अशा परस्परविरोधी घटना घडल्या. राक्षसभुवनाच्या (१७६३) तहाने पानिपतचे अपयश काहीसे धुऊन निघाले आणि १७५१ ते ६० मध्ये मिळविलेला निजामी राज्याचा मुलुख परत मिळाला.

पुढे निजाम अलीने चाळीस वर्षे राज्य केले, पण या पराभवानंतर तो मराठेशाहीचा दुय्यम सहकारी म्हणूनच वावरत होता. टिपू विरूद्धच्या मोहिमेत त्याने मराठ्यांना मदत केली; पण १७९५ मध्ये त्याने शंवटची उसळी मारली. यातूनच प्रसिद्ध खर्ड्याची लढाई उद्‍भवली. तीत निजामाचा पराभव होऊन त्याला नामुष्कीचा तह पतकरावा लागला ( १७९५ ).

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची सत्ता दुर्बल झाली. निजामाने परिस्थिती पाहून वाढत्या इंग्रजी सत्तेच्या जोखडात आपली मान अडकवून घेतली व त्याच्या साह्याने शिंदे, होळकरांचा पराभव करून वर्‍हाड व गोदावरीच्या आसपासचा प्रदेश मिळविला. निजामालाही हा प्रदेश फार काळ आपणाकडे ठेवता आला नाही. १८५३ मध्ये इंग्रजांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. निजामाने वर्‍हाड परत मिळविण्याची फार खटपट केली; पण तो त्याला मिळाला नाही.

ब्रिग्‍ज या इंग्रज लेखकाने नमूद केले आहे, की ‘हैदराबाद राज्याचा संस्थापक निजाम याला मोठेपण प्राप्त करून देणारे गुण म्हणजे त्याच्या स्वभावातील लवचिकपणा’ कमालीचा दुटप्पीपणा आणि निखालस तत्वहीनता’. थोड्या बहुत अंशाने याच गुणांच्या जोरावर त्याच्या वंशजांनी १९४७ पर्यत राज्य टिकवून ठेवले. स्वराज्य प्राप्तीनंतर हैदराबाद संस्थानाचा प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांत विलीन करण्यात आला.

संदर्भ :
१. Husain, Yusuf. The First Nizam : The Life and Times of Nizamu L – Mulk Asaf Jah I, New York, 1963
२. Mujumdar, R. C. Ed. Maratha Supremacy, Bombay, 1977
३.Sardesai. G. S. New History of the Marathas, Vols, II &III, Bombay, 1958
४. पगडी, सेतु माधवराव, मराठे व निजाम, पुणे, १९६१
५. शेजवलकर, त्र्यं. शं. निजाम–पेशवे संबंध, पुणे, १९५९
६. मराठी विश्वकोश

दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या मृत्यूनंतर थोरल्या बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. पहिल्या बाजीरावांनी सत्तेवर येताच दक्षिणेतील मराठी राज्याचे रक्षण करून उत्तरेकडे जास्तीजास्त वर्चस्व प्रस्थापिण्याचे धोरण आखले. निजाम आपणास मोगल बादशाहीचा सुभेदार समजून सर्व दक्षिणेवर हक्क सांगत होता. या परिस्थितीत संघर्ष…

Review Overview

User Rating !

Summary : दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती.

User Rating: 4.44 ( 4 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.