सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे.
राजे भेटीस निघाले
दुसरे दिवशी गडाखाली राजियानी सदर केली. डेरे, बिछाने व असमानगीर्या, तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या. चित्रविचित्र बडे व लोडे, गाद्या पदगाद्या टाकिल्या. सदर सिद्ध केली.
घाटमाथा लष्करसुध्धा नेताजी पालकर आणविले होते. त्यासी इशारत सांगोन पाठविले कि, ‘ उद्या खानाचे भेटीस जातो, फत्ते करितो आणि गडावरी येतो तेंव्हा एकच आवाज गडावरी करितो. तेंव्हा तुम्ही घाटाखाली उतरोन लष्करात खानच्या चालोन येऊन मारामारी करणे.’
तैसेच कोकणातून राजश्री मोरोपंत पेशवे आणविले. त्यासही गडावरील आवाजाची इशारत सांगितली. आपण निवडक लोक गडावरून उतरोन जागा जागा झाडीत ठेविले. आणि खास राजीयानी स्नान करून भोजन केले. जरीची कुडती घातली. डोईस मंदिल बांधिला. पायात चोळना घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनख चढविले आणि बराबर जिऊ महाला म्हणून मरदाना होता, त्याजवळ एक पट्टा व एक फिरंग व ढाल. तैसाच संभाजी कावजी महालदाराजवळ पट्टा व फिरंग व ढाल ऐसे दोघे माणसे मर्दानी आपणाबरोबरी भेटीस घेतली. वरकड आसपास धारकरी लोक जागा जागा जाळीत उभे केले. आणि राजियाने सिद्ध होऊन गडाखाली भेटीस जावयास उतरले.
उतावीळ खान
गोटातून भेटीस यावयास खानही सिद्ध होऊन चालले. बराबरी लष्कर हजार दीड हजार, बंदुकी मुस्ते होऊन चालिले. मोठे मोठे धारकरी लोक समागमे निघाले. इतक्यात पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला कि, ‘ इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघार गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय ! यास इतका सामान काय करावा, राजा दोघा माणसानिशी तिकडोन येईल. तुम्ही इकडोन दोघानिशी चालावे. दोघे बैसोन भेटावे. तेथे तजवीज करणे ते करा !’
असे सांगितल्यावरी अवघा जमाव दूर, बाणाचे टपियावरी उभे राहून खासा खान एक पालखी दोघे हुद्देकरी व कृष्णाजी – पंत हेजीब असे पुढे चालिले, सैदबंडा पटाईत, एक लष्करी समागमे घेतला. पंताजीपंतही बराबरी आहेत, असे सदरेत गेले.
सदर देखोन खान मनात जळाला कि, ‘ शिवाजी म्हणजे काय? शाहाजीचा लेक. वजीर यास असा जरी बिछाना नाही ! अशी मोतीलग सदर म्हणजे काय? पादशहास असा सामान नाही, येणे जातीचा त्याने सामान मेळविला ! ‘
असे बोलताच पंताजीपंत बोलिला जे, ‘ पातशाई माल पाद्शाहाचे घरी जाईल, त्याची इतकी तजवीज काय? ‘ असे बोलून सदरेस बैसले. राजियास सिताब आणवणे म्हणून जासूद, हरकारे रवाना केले.
अफझलखानाचा वध
राजे गडाचे पायी उभे होते. तेथून हळूहळू चालिले. समाचार घेता खानाबरोबर सैदबंडा मोठा धारकरी आहे हे ऐकून उभे राहिले. आणि पंताजी पंतास बोलावू पाठविले. ते आले. त्यास म्हणू लागले जे, ‘ जैसे महाराज तैसे खान. आपण खानाचा भतीजा होय. ते वडील. सैदबंडा खानाजवळ आहे. त्या करिता शंका वाटते. हा सैदबंडा इतका यातून दूर पाठवणे, ‘ म्हणोन पंताजी पंतास सांगितले.
त्यावरून पंताजी पंत याणी जाऊन कृष्णाजी पंताकडून खानास सांगोन सैदबंडाहि दूर पाठविला. खान व दोघे हुद्देकरी राहिले. तेंव्हा राजेही हिकडून जिऊ महाला व संभाजी कावजी दोघे हुद्देकरी यासहित गेले.
खानही उभा राहून पुढे सामोरा येऊन राजियास भेटला. राजियाने भेटी देता खानाने राजियाची मुंडी कवटाळून खाकेखाली धरिली. आणि हातीची जमदाड होती, तिचे मेणे टाकून कुशीत राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती. त्यावरी खरखरली. अंगास लागली नाही.
हे देखोन राजियानी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानची चरबी बाहेर आली ! दुसरा हात उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला. ऐसे दोन वार करून मुंडी आसडून चौथरियाखाली उडी घालोन निघोन गेले !
खानाने गलबला केला कि, ‘ मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा ! ‘ असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले. आणि पालखी खळे भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले ; हाती घेऊन राजियाजवळ आला.
इतकियात सैदबंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावारी चालविले. तो राजियाने जिऊ महालियाजवळ आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन, पट्टा व बिचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार औढिले ! पाचवे हाताने राजियास सैदबंडा मारावा, तो इतकियात जिऊ महाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टीयाचा हात हत्यारासमेत तोडिला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.
घोरांदर युद्ध जाहले!
गडावरी जाताच एका भांड्याचा आवाज केला. तोच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोकडून चालोन खानाचे गोटावारी आले आणि ‘ खान मारून शीर कापून राजे गडावरी गेले ‘ हि खबर कळोन कुल खानाचे बारा हजार लष्कर धास्त घेऊन अवसान खस्त जाहाले. इतकियात राजियाच्या फौजा चौतर्फा मारीत चालले. मोठे घोरांदर युद्ध जाहाले. दोन प्रहर घोरांदर युद्ध जाहले.
खानाकडील मोठमोठे वजीर व लष्करी महदीन व उजदीन पठाण, रोहिले, सुन्नी (?) व आरबी वगैरे मुसलमान आणि जातिवंत मराठे, धनगर व ब्राम्हण ; तसेच तोफांचे बैली व कर्नाटकी प्यादे बदुखी, आड हत्यारी, सांगा बरचीवाले व दुरादीवाले, कुराडीवाले (=रोचेवार व हिलगेवर) व बाजे जातचे, इटेकरी हतुलवे (?) तिरंदाज व छडीवाले व पटाईत खाकाईत व तोफखाना ऐसे एकंदर जमनिदान करून भांडण दिधले. मोठे क्षेत्र जाहले. राजियाचे लष्करी लोकांनी व मावळे लोकांनी पाय उतार होऊन मारामारी केल्या. हत्ती तोडिले, ते जागा ठार झाले. कित्येक हत्तीची पुच्छे तोडिली. कित्येक हत्तीचे दात तोडिले. कित्येक हत्तीचे पाय तोडिले. तसेच घोडे एकच वराने जीवे मारिले. तसेच खानाचे लष्करी कित्येक ठार मारिले. कित्येकाचे पाय तोडून पाडिले. कित्येकांचे दात उडविले. कित्येकांची डोचकी फोडिली. कित्येक मेले. युद्धास आले ते मारून पडून भुईस रगडिले. तसेच उंटे मारिली. मारित असता रण अपार पडले. संख्या न करवे ! रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले. ऐसे मारामारी करून हत्ती, घोडे, उंट व मालमत्ता व पालख्या वजीर पाडाव करून आणिले. –
बीतपशील
६५ हत्ती व हत्तिणी सुमार ४००० घोडे सुमार
३,००,००० जडजवाहीर १,२०० उंटे सुमार
२,००० कापड वोझी ७,००,००० नगद व मोहोरा व होन सोने रुपये.
भांडी तोफखाना सर्वही घेतले. कलम १. वजीर पाडाव जाहले : बीतपशील –
१ सरदार व वजीर मातबर. १ मंबाजी भोसले, १ अफझलखानाचे पुत्र १ नाटकशाळेचे पुत्र, १ राजेश्री झुंजारराव घाडगे, १ या खेरीज लोक कलम १ येणे प्रमाणे पाडाव केले. या खेरीजही जिन्नस मालमत्ता, गुरेढोरे, बैल, मबलग मत्त पाडाव केले. भांडते लोकांनी तोंडी तृण धरून शरण आले त्यासी व बायकामुले, भट-ब्राह्मण, गोरगरीब असे अनाथ करून सोडिले. राजा पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही. याजकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनात सोडिले. अफझलखानाचा लेक फजल हा पायी चिरगुटे बांधून झाडीत पळोन गेला. तसेच कित्येक भले लोक पळोन गेले. संख्या न करवे.
जखमी सैनिकांची विचारपूस
ऐशी फत्ते करून जय जाहला. मग राजे याणी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते, त्यास धरून आणिले. राजा खास प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफझलखानाचे लोक व त्याचे पुत्र, भांडते माणूस होते, तितकियास भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते, त्यांच्या लोकास चालविले. पुत्र नाही त्यांच्या बाय्कास निमे वेतन करून चालवावे असे केले. जखमी जाहले त्यास दोनशे होन व शंभर होन, दर आसामीस जखम पाहून दिधले. मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते, त्यास बक्षीस हत्ती, घोडे दिधले. हस्तकडी, कंठमळा, तुरे, पदके, चौकडे, मोत्यांचे तुरे, कित्येकास बक्षीस फार दिले. ऐसे देणे लोकास दिधले. कित्येकास गावमोकासे बक्षिस दिधले. लोक नावाजिले. दिलासा केला.
विजयोत्सव
मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला. असा वीरावीरास झगडा जाहाला. खासा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफझलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनच जातीने होता. आंगाचा, बळाचाही तैसाच ! आणि दुष्ट बुद्धीने तैसाच ! त्यास एकले भीमाने मारिला, त्याचप्रमाणे केले. शिवाजी राजाही भीमच ! त्यांनीच अफझल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीच होता. तरीच हे कर्म केले. यश आले, असे जाहाले. खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे, भूषणे, अश्व देऊन अनाथ करून सोडिले. त्या उपरी राजश्री पंताजीपंतासही उदंड वस्त्रे, अश्व, अलंकार दिधले. अपर द्रव्यही दिधले. खुशाली केली.
राजगडास मातुश्रीस व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली. त्यानीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे – करणे केले. भांडी मारिली. मोठी खुशाली केली. येणे रीतीने राजियाकडील वर्तमान जाहाले.
विजापुरी एकच आकांत!
त्या उपरि विजापुरास चवथे दिवशी जासूद – हरकारे यांनी खबर पाद्शाहास व पाद्शाहाजादीस जाहीर केली कि, ‘ अफझलखान खासा मारून शिर कापून नेले. कुल लष्कर लुटून फस्त केले, ‘ असे सांगताच अली अदलशाहातक्तावरोन उतरोन महालात जाऊन पलंगावरी निजला. त्याणे बहुत खेद केला. असेच पाद्शाहाजादीसखबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथेच ” अल्ला ! अल्ला ! खुदा, खुदा ! ” म्हणून अंग पलंगावरी टाकून रडत पडली. ” मुसलमानाची पादशाही खुदाने बुडविली,” ऐसा कित्येक विलाप करून बहुत शोक केला. पाद्शाहाजादीने तीन दिवस अन्न – उदक घेतले नाही. तसेच कुल मोठमोठे वजीर व लष्कर व कुल शहर दिलगीर जाहाले. म्हणू लागले कि, ‘ उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल ! ‘ ऐसे घाबरे जाहले. खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्यांसी दिली असे वाटते ‘ असे म्हणो लागले.
प्रतापगडी देवीची स्थापना
त्या उपरांत मग राजियासी स्वप्नात श्री भवानी तुळजापुरची येऊन बोलू लागली कि, ‘ आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण. तुझ्या राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पूजा – पूजन प्रकार चालविणे. ‘
त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून ; गंडकीनदीहून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नानाप्रकारे करून दिली. महाल मोकाशे देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोच्छाव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापुरच्याप्रमाणे तेथे चालती झाली. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात कि, ‘ आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे, ‘ असे देवी बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.
मोगलाईत धुंद उठवली
या नंतरि, विजापूरचा मातबर वजीर अफझलखान होत तो बुडविला, तेंव्हा पातशाही कमतर पडली, असे समजून राजीयाने विजापूरचे किल्ले तळकोकणात होते ते, सर्व घेतले. पन्नास – साथ गड घेतले. तळकोकण काबीज केले. वरघाटही घेतला. तेंव्हा लष्कर पागा सात हजार व शिलेदार आठ हजार, एकूण पंधरा हजार व हशम लोक बारा हजार ऐसी तोलदार फौज जमा जाहाली. लष्कर कुल जमाव घेऊन नेताजी प्लकर सरनोबत मोगलाईत स्वार्या करून, बालेघाट, परांडे, हवेली, कल्याण, कलबर्गे, आवसे, उदगीर, गंगातीर पावेतो मुलुख मारीत चालले. खंडण्या घेतल्या. मुलुख जप्त केला. औरंगाबादचे पुरे मारिले. मोगलांकडील फौजदार औरंगाबादेस होता तो चालून आला. त्याशी युद्ध जाहाले. हत्ती घोडे पाडाव केले. मोगलाईत धुंद उठविली. ऐसा पराक्रम करीत चालले.
संदर्भ – सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद
Review Overview
User Rating!
Summary : खानाने गलबला केला कि, ' मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा ! ' असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले. आणि पालखी खळे भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले ; हाती घेऊन राजियाजवळ आला.